शेतकरी संघटनांनी केलेल्या ऊस दर जाहीर करण्याच्या मागणीवरून सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतलेल्या बैठकीत जिल्ह्यातील साखर कारखान्यांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत ऊसदर जाहीर करण्याची मुदत दिली आहे.
राज्यासह जिल्ह्यातील साखर हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. परतीचा पाऊस उशिरापर्यंत पडल्याने व तसेच ऑक्टोबर महिन्यातही पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने अद्याप साखर कारखान्यांच्या गाळपाला म्हणावा तितका वेग आला नाही. दरम्यान, शेतकरी संघटनांनी ऊसदर अगोदर जाहीर करण्याची मागणी केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखान्यांची बैठक शुक्रवारी घेतली.
बैठकीत साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी त्यांची बाजू मांडली. केंद्र सरकारने केलेला एफआरपी कायदा व साखर उताऱ्यानुसार द्यावयाचा ऊसदर याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत ऊसदर जाहीर करण्यास मुदत दिली.
बैठकीला प्रादेशिक उपसंचालक जिजाबा गावडे, कार्यालयीन अधीक्षक इरण्णा निंबर्गी, लोकमंगलचे सतीश देशमुख, पराग पाटील, विठ्ठल गुरसाळे कार्यकारी संचालक दत्तात्रय गायकवाड, शंकरचे स्वरुप देशमुख, सहकार महर्षीचे चौगुले, विठ्ठलराव शिंदे, करकंबचे संतोष येलपले, अवताडे शुगर, युरोपियन, श्री. संत दामाजी, सिध्दनाथ शुगर तिर्हे, पांडुरंगचे प्रतिनिधी उपस्थित होते.
काय आहेत मुद्दे..
• राजवी ॲग्रो आलेगाव (जुना भैरवनाथ) च्या वतीने तीन हजार एक रुपया प्रतिटन दर जाहीर केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले.
• २०२३- २४ या वर्षाचा साखर उतारा २४-२५ या वर्षाच्या हंगामातील एफआरपीसाठी ग्राह्य धरला. २४-२५ चा साखर उतारा सुरू असलेल्या (२०२५-२६) गाळप हंगामासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
• ९.५० टक्के साखर उतारा पडल्यास ३२९० रुपये ५० पैसे एफआरपी.
• १०.२५ टक्के साखर उताऱ्यास ३५५० रुपये एफआरपी, एक टक्का साखर उतारा वाढल्यास किंवा कमी झाल्यास ३ रुपये ४६ पैसे कमीअधिक करायचे आहेत.
• (साडेनऊ टक्क्यांपेक्षा कमी उतारा पडला तर साडेनऊ टक्के उतारा ग्राह्य धरून एफआरपी द्यावयाची आहे) एका क्विंटलला ३५५ रुपये ग्राह्य धरण्यात येणार आहे.
• शेतकरी संघटनांनी ३४०० रुपये व ३७०० रुपये दर देण्याची मागणी केली आहे.
