आंब्याला फळांचा राजा म्हणतात. मंगलसुचक असा हा आंबा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक राहिला आहे. आयुर्वेदात त्याचे अनन्यसाधारण महत्त्व असून, या आंब्याची साल, मोहोर, फळे पाणे, कोय, कच्ची कैरी आदींचे आयुर्वेदात महत्त्व सांगितले आहे.
उष्ण कटीबंधातले हे फळ असून, हिंदुस्थानात चार हजार वर्षापासून आंबा प्रचारात आहे. आंब्याच्या साधारणपणे एक हजार जाती अस्तित्वात आहे. आंब्याच्या झाडाचे वय जसजसे वाढत जाते, तसतशी त्यावरील फळांची संख्या सुद्धा वाढत जाते. आंब्याचे देशी व कलमी, असे दोन प्रकार आहेत.
त्यापैकी देशी औषधाच्या दृष्टीने अधिक लाभदायक असतो. आंबा हा गोड, स्निग्ध, हृदयाला हितकारक, बल्य, शुक्रवर्धक, मांसवर्धक, पुष्टीकारक, कांती वाढवणारे, पोट साफ करणारे व थकवा घालवणारे असे आहे. आंब्यात १६.९ टक्के कर्बोदके असून, त्यातून ७४ टक्के उष्मांक मिळतात.
एका आंब्यातून सरासरी २५ ग्रॅम जीवनसत्व 'क' मिळते. तसेच जीवनसत्व 'अ' मिळण्याचा आंबा एक महत्त्वाचा स्रोत आहे. जीवनसत्व 'अ' हे यकृतात साचून राहते. हे फळ वर्षाकाठी अडीच महिने उपलब्ध होत असले, तरी त्याच्या सेवनातून वर्षभर पुरेल एवढे अ जिवनसत्व शरीरात साचून राहू शकते.
आंब्याची कोय
शौचावाटे रक्त पडत असल्यास, स्त्रियांना अंगावर जास्त जात असल्यास कोय उगाळून काढा द्यावा, रक्तस्त्राव तत्काळ थांबतो. गर्भाशयावरील सुज कमी होते. कोयीतील मगज बालकांमधील जंत घालविणारा आहे.
आंब्याचा मोहोर
मोहोर वाळवून केलेले चूर्ण (भुकटी) व बेलाच्या पानांचा रस एकत्र सकाळ-संध्याकाळ घेतल्यास मधुमेहातील वारंवार होणारी लघवी कमी होते. विंचू चावल्यास मोहोर वाटून लावावा.
झाडाची साल ठरतेय फायद्याची
साल ही जुलाब व अति प्रमाणात होणारा रक्तस्त्राव थांबवणारी आहे. विशेषतः पोट दुखून लालसर आव पडत असल्यास आंब्याची अंतर्साल ठेचून त्यात अर्धा लिटर पाणी घालून अष्टमांश आटवून काढा तयार करावा व मध टाकून प्यावा. साल उगाळून लावल्यास मुरुम, पुटकुळ्या, घामोळ्या इ. त्वचाविकार दूर होतात.
आंबा हा भूक वाढवणारा, वीर्य वाढून प्रजननक्षमता वाढवणारा आहे. मात्र, वैशाख व जेष्ठ महिन्याशिवाय आंब्याच्या फळांचे सेवन करू नये. - डॉ मिलिंद सज्जनवार, आयुर्वेद तज्ज्ञ वर्धा.