सोलापूर : शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या संमतीने जमीन महसुली संमतीने जमीन महसुली कलम ८५ नुसार शेतजमिनीचे आपसात संमतीने वाटप करण्याचा अनोखा उपक्रम दक्षिण सोलापुरात राबविण्यात आला तहसीलदार किरण जमदाडे यांनी राबवला.
तहसीलदार किरण जमदाडे तालुक्यातील धोत्री येथे शेत रस्त्याच्या स्थळ पाहणीसाठी एका शेतकऱ्याच्या बांधावर गेले होते. त्याच वेळी धोत्रीचे वयोवृद्ध शेतकरी सिद्धप्पा नंदनगे दोन भावासह तेथे आले.
त्यांनी आपली समस्या सांगितली आणि सातबारा उतारे त्यांच्यासमोर ठेवले. यापूर्वी जमीन वाटपाचा अर्ज कार्यालयात दिल्याचे त्यांनी सांगितले असता कुटुंबातील सर्व सदस्य आणि वारसदार शेताच्या वस्तीवर हजर असल्याची खात्री तहसीलदारांनी केली आणि त्या वस्तीवर गेले.
झाडाखाली बैठक मारून चर्चा करीत सर्व संमतीने त्यांच्या शेतजमिनीचे वाटप केले. रस्त्याची वहिवाट, जमिनीच्या दिशा, विहिरीतील पाण्याच्या पाळ्या निश्चित केल्या. त्याचा आदेश तयार करीत कलम ८५ नुसार संपूर्ण कुटुंबाच्या शेतजमिनीचे वाटप केले.
अर्धशिक्षित नंदनगे कुटुंबात हिस्सेदारांची संख्या मोठी असल्याने त्यांना जमीन वाटपासाठी शहरात आणणे जिकिरीचे होते. त्यासाठी होणारा खर्च, स्टॅम्प ड्यूटीचा खर्च, नोंदणीच्या खर्चात बचत झाल्याने नंदनगे कुटुंबीय भलतेच सुखावले.
सोबत तलाठी दीपिका ठाकूर याही उपस्थित असल्याने तहसीलदार जमदाडे यांना हा उपक्रम राबवणे सोयीस्कर ठरले.
काय आहे कलम ८५
- महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अंतर्गत धारण जमिनीचे विभाजन नियम १९६७ नुसार शेतजमिनीच्या विभाजनाचा आदेश करण्याचा तहसीलदारांना अधिकार आहे.
- यात एकत्र कुटुंबातील सर्व सदस्य आणि त्यांच्या वारसदारांना त्यांच्या संमतीने शेतजमिनीचे वाटप केले जाते.
- याच वाटपामध्ये विहीर, रस्ते व इतर वहिवाट यांचाही समावेश करता येतो.
- मात्र शेतजमिनीच्या मालकीबाबत वाद असल्यास या कलमाखाली वाटप करता येत नाही.
अधिक वाचा: मुलींचे वडील हयात असतानांही त्यांना शेतजमिनीत हिस्सा मिळू शकतो? काय आहे नियम; वाचा सविस्तर