जळगाव जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही काही विक्रेते शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. लिंकिंग करून अवाजवी दराने खतांची विक्री तसेच कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलत खतसाठ्याची माहिती थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे परवानाधारकांकडे आता घरबसल्या असलेल्या खतांच्या साठ्याची माहिती उपलब्ध होणार आहे.
केंद्रनिहाय खतसाठ्याची माहिती समजणार
• शेतकऱ्यांनी मोबाईलवरील लिंकवर क्लिक करताच संबंधित तालुक्यातील परवानाधारक विक्रेत्यांकडे कोणत्या खताचा किती साठा उपलब्ध आहे, याची माहिती तत्काळ पाहता येणार आहे.
• त्यामुळे साठेबाजी, कृत्रिम टंचाई आणि काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांचे पितळ उघडे पडणार असून, शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यास मदत होणार आहे.
• दरम्यान, जिल्हा परिषद कृषी विभागाने अमळनेर तालुक्यात एका कृषी केंद्रावर डमी ग्राहक पाठवून पडताळणी केली होती. त्यावेळी प्रत्यक्षात खतसाठा उपलब्ध असतानाही विक्रेत्याकडून खत नसल्याचे सांगण्यात आले.
• या घटनेनंतर जिल्ह्यात सुरू असलेल्या खतांच्या काळाबाजारावर शिक्कामोर्तब झाले असून, प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाने डिजिटल उपाययोजना राबवत तालुकानिहाय खतसाठ्याची माहिती ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे.
• शेतकऱ्यांना आता संबंधित लिंकवर जाऊन तालुक्याची निवड करावी लागणार असून, त्यानंतर कृषी केंद्रनिहाय खतसाठ्याची माहिती पाहता येणार आहे.
कुठे शोधाल माहिती ?
शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या https://adozpjalgaonfertilizer.bl ogspot.com/p/ado-zp-fertilizer-stock-jalgaon.html या लिंकवर जावे लागेल. त्याठिकाणी तालुक्याची निवड केल्यानंतर कृषी केंद्रांवर उपलब्ध असलेल्या खतांच्या साठ्याविषयी माहिती उपलब्ध होणार आहे.
खतांच्या साठ्याची तालुकानिहाय माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी, यासाठी एक मोबाईल लिंक विकसित केली आहे. त्यानुसार साठ्याची माहिती घेतल्यानंतर शेतकऱ्याला खते न दिल्याची तक्रार प्राप्त झाल्यास कारवाई केली जाणार आहे. - विकास बोरसे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक.
