खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने गोंदिया जिल्ह्यात कृषी केंद्राची धडक तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत अनियमितता आणि नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्याने जिल्हा कृषी विभागाने १६० कृषी केंद्रांचे परवाने रद्द तर ७१ केंद्रांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे कृषी केंद्र संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
गोंदिया जिल्ह्यात खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांत धानाची लागवड केली जाते. तर काही शेतकरी मक्यासह इतर पिकांची लागवड करीत आहेत. त्यामुळे या दोन्ही हंगामांत खते, बियाणे व कीटकनाशके यांची भरपूर मागणी असते.
काही कृषी केंद्र संचालक शेतकऱ्यांच्या गरजेचा फायदा घेत मान्यता नसलेल्या कंपनीच्या बियाणे व कीटकनाशकांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करतात. तर खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून जादा दराने शेतकऱ्यांना युरियासह इतर खतांची विक्री करतात.
पंधरा दिवसांपूर्वीच गोरेगाव तालुक्यातील एका कृषी केंद्रावरून छत्तीसगड येथील मान्यता नसलेल्या कीटकनाशकाची शेतकऱ्यांना विक्री करण्यात आली. या कीटकनाशकाची फवारणी केल्याने संबंधित शेतकऱ्याचे नुकसान झाले.
याची तक्रारसुद्धा कृषी विभागाकडे करण्यात आली. विशेष म्हणजे खरीप हंगाम तोंडावर असल्याने खते, बियाणांचा काळाबाजार वाढण्याची शक्यता आहे. हीच शक्यता लक्षात घेत कृषी विभागाने जिल्ह्यातील एकूण ९९८ कृषी केंद्रांची धडक तपासणी मोहीम राबविली.
या मोहिमेदरम्यान काही कृषी केंद्रांमध्ये खताचा स्टॉक बरोबर नसणे, ई-पॉस मशिनवर खताची विक्री न करणे, दर फलक न लावणे, स्टॉक रजिस्टर नियमित न भरणे, वाढीव दराने खते, बियाणांची विक्री करणे तसेच मान्यता नसलेल्या कंपन्यांच्या कीटकनाशकांची शेतकऱ्यांना विक्री करणे आदी विविध कारणांमुळे ४४ खते विक्री परवाने निलंबित तर ७६ परवाने रद्द केले.
तसेच बियाणे विक्रेत्यांचे १४ परवाने निलंबित तर ३३ परवाने रद्द केले. त्याचप्रमाणे कीटकनाशक विक्रेत्यांचे १३ परवाने निलंबित आणि ५१ परवाने रद्दे केले. असे एकूण ७१ परवाने निलंबित तर १६० परवाने रद्द करण्याची कारवाई कृषी विभागाने केली आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाने केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
सीमावर्ती भागातील नाक्यावर होणार तपासणी
गोंदिया जिल्ह्याला मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्याची सीमा लागून असल्याने जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात या राज्यात खताची तस्करी केली जात असल्याची ओरड आहे.
याच पार्श्वभूमीवर यंदा कृषी विभागाने जिल्ह्यातील सर्व सीमावर्ती भागातील तपासणी नाक्यांवर कृषी विभागाने दोन निरीक्षकांची नियुक्ती केली असून, ते या नाक्यावर तपासणी करणार आहेत. यासाठी पोलिस विभागाचीसुद्धा मदत घेतली जाणार आहे.
खरीप हंगामादरम्यान जिल्ह्यात खते, बियाणांचा काळाबाजार होऊ नये तसेच शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात कृषी केंद्राची धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात काही कृषी केंद्रांमध्ये अनियमितता आढळल्याने १६० कृषी केंद्रांचे परवाने रद्द तर ७१ परवाने निलंबित करण्यात आले. - नीलेश कानवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
६ मे च्या बैठकीत होणार मंथन
खरीप हंगामाच्या तोंडावर खते, बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत विविध उपाययोजनांवर मंथन होणार असल्याची माहिती आहे.
