नाशिक जिल्ह्याच्या ओझर येथील मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या श्री खंडेराव मंदिराजवळ अवैध विनापरवाना कीटकनाशके व जैव उत्तेजक विक्री होत असल्याची गुप्त माहिती जिल्हा कृषी अधिकारी यांना मिळाल्यानंतर त्यांच्या भरारी पथकाने मंगळवारी (दि.२६) अचानक धाड टाकून १ लाख ६९ हजार ९०४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला अवैध विनापरवाना कीटकनाशके व जैवउत्तेजक जिल्ह्यात विक्री होत असल्याची खबर प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख संजय शेवाळे, कृषी विकास अधिकारी सदस्य डॉ. जगन सूर्यवंशी, जिल्हा गुणवता नियंत्रण निरीक्षक तसेच गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल धनगर यांनी बनावट ग्राहक पाठवून कीटकनाशके व जैवउत्तेजकाची विक्री करणारे संशयित गोविंद भामरे यांच्याकडे भ्रमणध्वनीद्वारे मालाची मागणी केली. त्याप्रमाणे संशयिताने ओझर येथील खंडेराव मंदिराजवळ माल घेऊन येणार असल्याचे सांगितले.
त्यानुसार संशयित अगोदरच मालासह उपस्थित होता. यावेळी डॉ. जगन सूर्यवंशी व राहुल धनगर यांनी बिलाची व परवान्याची मागणी केली असता भामरे याने कुठल्याही प्रकारचे बिल व परवाना सादर केले नाही. मालाबद्दल संशय बळावल्याने संशयिताला ओझर पोलिस ठाणे येथे घेऊन जात मालाची पंचासमक्ष शहानिशा करण्यात आली.
यावेळी बायर क्रॉप सायन्सचे लुना व नेटिवो तर सिजेंटा कंपनीचे स्कोर हे बुरशीनाशक, सिजेंटा कंपनीचेच इसाबिऑन व पेन्शिबाओ वांग प्रा. लि. चे बायो-आर ३०३ हे जैवउत्तेजक असा एकूण १ लाख ६९ हजार ९०४ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. कीटकनाशक व बायोस्टीमुलंट पोलिस स्टेशनमध्ये जमा करून त्यातून कीटकनाशके कायदा तरतुदीनुसार कीटकनाशकाचे नमुने काढण्यात आले.
तिघांवर गुन्हा दाखल
संशयित आरोपी गोविंद भामरे, वैभव यादवराव सोनवणे व कुलकर्णी (पुणे) यांच्याविरुद्ध विनापरवाना बेकायदेशीररीत्या बोगस कीटकनाशक व बायोस्टीमुलंट साठा करून शेतकऱ्यांना विक्री व वितरण करणे, कीटकनाशकाची नोंदणी न करणे, उगम प्रमाणपत्र नसणे, उत्पादन व विक्री परवाना नसणे यामुळे शासनाची व शेतकऱ्यांची दिशाभूल करून फसवणूक केली असल्याने ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेते यांच्याकडून पक्के बिल घेऊन कीटकनाशके व जैवउत्तेजक खरेदी करावे. बोगस कीटकनाशकांबाबत सावध राहावे. - रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक.