पुणे : कृषी महाविद्यालय येथे १५ ते १७ मे या कालावधीत आयोजित अॅग्री हॅकेथॉन स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे.
तर स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून आतापर्यंत १ हजार २९० अर्ज आले आहेत. यंदा यात प्रथमच २१ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांतील अर्जदारांचा समावेश आहे. यातील १२० नवकल्पनांची निवड प्रत्यक्ष प्रदर्शनाकरिता केली आहे.
यंदाच्या स्पर्धेसाठी उत्साहवर्धक प्रतिसाद लाभला असून मृदा आरोग्य आणि व्यवस्थापन, स्मार्ट जल व्यवस्थापन आणि ऑटोमेशन, शेती यांत्रिकीकरण (एआय आणि रोबोटिक्स), कृषी प्रक्रिया आणि मूल्य साखळी, अक्षय ऊर्जा आणि कृषी-कचरा व्यवस्थापन या विषयांवरील नवे संशोधन अर्ज आले आहेत.
तसेच पीक संरक्षण आणि कीड व्यवस्थापन, हवामान-अनुकूल आणि डिजिटल शेती, प्रभावी कृषी प्रशासनासाठी एआय, तंत्रज्ञान आधारित हस्तक्षेप प्रभावी आपत्ती व्यवस्थापन, पीक नुकसानीचे मूल्यांकन आणि भाकितासाठी एआय, तंत्रज्ञान, साधने या विषयांवरील नवे संशोधन अर्ज आले आहेत.
राज्यनिहाय प्राप्त झालेल्या अर्जामध्ये २१ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. अर्जामध्ये महाराष्ट्र ८६७, तमिळनाडू २३१, तेलंगणा २८, कर्नाटक २३, उत्तर प्रदेश २२, राजस्थान व मध्य प्रदेश प्रत्येकी १८, गुजरात १७, पंजाब १६, दिल्ली ८, ओडिशा ७, अरुणाचल प्रदेश ६ असे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत.
केरळ ५, हरयाणा व आसाम प्रत्येकी ४, पश्चिम बंगाल, चंडीगड, बिहार व उत्तराखंड प्रत्येकी २, गोवा, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश व लडाख प्रत्येकी १ याप्रमाणे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत.
या प्राप्त अर्जाची प्राथमिक छाननी ज्युरी पॅनेलद्वारे केली आहे. प्राथमिक छाननीमध्ये १२० नवकल्पना यांची निवड प्रत्यक्ष प्रदर्शनाकरिता करण्यात आली आहे.
यामधून प्रत्येक प्रवर्गातून एक विजेता व उपविजेता यांची निवड करण्यात येईल. विजेत्यास रुपये २५ लाख रुपये व उपविजेत्यास रुपये १५ लाख पारितोषिक देण्यात येणार आहे.
मागील वर्षी घेतलेल्या स्पर्धेचे परिणाम उत्साहवर्धक असून एकूण निवडलेल्या १६ पैकी १२ नवकल्पना, उत्पादने यांना कृषी विद्यापीठाकडून प्रमाणीकरण प्राप्त झाले आहे.
यातील चार उत्पादनांचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन सुरू झाले असून उर्वरित विकसनाच्या प्रक्रियेत आहेत. तसेच यातील ४ उत्पादनांना कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत समाविष्ट करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण कल्पना, उत्पादने यांना आकृष्ट करणे, या नवतंत्रज्ञांना योग्य व्यासपीठ व योग्य व्यवस्था निर्माण करणे, या उद्देशाने या अॅग्री हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती जितेंद्र डुडी यांनी दिली.
अधिक वाचा: कर्जमाफीच्या याद्या तयार; शेतकऱ्यांना 'या' बँकांकडून मिळणार सर्वाधिक कर्जमाफीचा लाभ
Web Summary : Pune hosts Agri Hackathon to boost farm innovation. Over 1290 applications from 21 states received, showcasing advancements in soil management, smart irrigation, and AI in agriculture. Winners get ₹25 lakh prize.
Web Summary : पुणे में कृषि नवाचार को बढ़ावा देने के लिए एग्री हैकथॉन आयोजित किया गया। 21 राज्यों से 1290 से अधिक आवेदन प्राप्त हुए, जिसमें मृदा प्रबंधन, स्मार्ट सिंचाई और कृषि में एआई में प्रगति का प्रदर्शन किया गया। विजेताओं को ₹25 लाख का पुरस्कार।