अफगाणिस्तानातून तस्करी केलेला बेदाणा थेट तासगाव आणि सांगलीच्या कोल्ड स्टोरेजवर असल्याची माहिती मिळाल्यानंतर द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्ड स्टोरेज आणि वॉशिंग सेंटरवर धाडी टाकल्या.
ज्यात अनेक ठिकाणी अफगाणिस्तानचा बेदाणा आढळून आला. मात्र, वॉशिंग सेंटर आणि कोल्ड स्टोरेज चालकांनी या बेदाण्याबाबत अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली. बेकायदेशीरपणे बेदाणा आयात करून केमिकलची प्रक्रिया करून भारतीय पॅकिंगमध्ये विक्री केली जात आहे.
यामुळे फसवणूक होत असून त्याचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसत आहे. त्यामुळे या रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा द्राक्ष बागायतदार संघाकडून देण्यात आला. शनिवारी अफगाणिस्तानचा बेदाणा तासगावच्या काही कोल्ड स्टोरेज आणि वॉशिंग सेंटरवर आल्याची माहिती द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली.
त्यानंतर संघाचे राज्य उपाध्यक्ष मारुती चव्हाण, विभागीय अध्यक्ष दत्ताजीराव पाटील, सचिव तुकाराम माळी, संचालक सुरेश करगणे, परशुराम एरंडोले, प्रताप चव्हाण, किशोर सावंत, रोहित पाटील, प्रदीप पाटील, जितेंद्र जाधव, सुरेश जमदाडे यांच्यासह द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी मणेराजुरी रस्त्यालगत असणाऱ्या कोल्ड स्टोरेज आणि वॉशिंग सेंटरवर धाड टाकली.
बऱ्याच ठिकाणी अफगाणिस्तानहून आलेला बेदाणा कोल्ड स्टोरेजवर साठा केलेला असल्याचे, तसेच वॉशिंग सेंटरवर केमिकलयुक्त प्रक्रिया करून काळा बेदाणा 'कलर' देऊन, अफगाणिस्तानच्या दहा किलोच्या पॅकिंगऐवजी भारतीय १५ किलोच्या पॅकिंगमध्ये पुन्हा विक्रीसाठी मार्केटमध्ये नेला जात असल्याचे आढळून आले.
प्रमाणपत्र नसतानाही विक्री
सांगली-तासगावातील काही व्यापाऱ्यांकडून बेकायदेशीररीत्या अफगाणिस्तानचा बेदाणा आयात केला जात आहे. निकृष्ट बेदाण्याला केमिकल प्रक्रिया करून तो भारतीय पॅकिंगमध्ये बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी उपलब्ध केला जात आहे. या बेदाण्याला फाइटोसॅनिटरी प्रमाणपत्र नसतानाही विकले जात आहे.
हेही वाचा : आता सर्पदंशावर होणार अचूक उपचार; स्नेक वेनम किटमुळे कळणार सर्पदंश विषारी की बिनविषारी
