सोलापूर : शेतकऱ्यांना उसाच्या पैशासाठी वेठीला धरणाऱ्या साखर कारखान्यांनी दुसरीकडे शासकीय देणीही दिली नाहीत.
साखर आयुक्तांनी अशा कारखान्यांना गाळप परवाना नाकारला असतानाही हंगाम सुरू केल्याने जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांना २० कोटी ३२ लाख २५ हजार रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. राज्यात असे सोलापूर जिल्ह्यातच साखर कारखाने आहेत.
सोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या सर्वाधिक असताना एफआरपी थकविणे व साखर कारखाना विक्री करण्याला प्राधान्य दिले जात आहे.
यामुळे ऊस घालून पैसे न मिळालेले शेतकरी, तोडणी वाहतूक केलेले मजूर व वाहन धारक आर्थिक अडचणीत येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ३२ साखर कारखान्यांनी यंदा गाळप हंगाम घेतला.
मागील वर्षातील ऊस उत्पादकांचे, तोडणी व वाहतुकीचे तसेच शासकीय देणे थकविणाऱ्यांना साखर आयुक्तांनी गाळप परवाना नाकारला.
देणी द्या मगच गाळप परवान्याला या असे बजावले असताना परवान्याशिवाय सोलापूर जिल्ह्यात चार कारखान्यांनी गाळप सुरू केले. प्रतिटन ५०० रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई साखर आयुक्तांनी केली आहे.
दामाजी कारखान्याला सर्वाधिक दंड
मंगळवेढ्याच्या श्री संत दामाजी साखर कारखान्याला १० कोटी २२ लाख ५० हजार रुपये, धोत्री येथील गोकुळ शुगरला ५ कोटी ७० लाख ९७ हजार ५०० रुपये, टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारीला तीन कोटी १३ लाख ९७ हजार ५०० रुपये व मातोश्री लक्ष्मी शुगरला एक कोटी २४ लाख ८० हजार रुपये दंड आकारला आहे. रकमेत आणखीन वाढ होईल असे सांगण्यात आले.
पुन्हा शेतकऱ्यांची देणी
मागील वर्षी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे कारखान्यांनी साखर हंगाम सुरू होताना खात्यावर जमा केले. उसाचे पैसे देण्यासाठी घायकुतीला आलेल्या कारखान्यांना इतर देणी देता आली नाहीत. गाळप परवाना मिळाला नसताना ऊस गाळप केले. आता दंड माफीसाठी सहकार मंत्री व न्यायालयात प्रकरण अडकवून टाकले जाते. इकडे यावर्षीच्या गाळपाला आणलेल्या उसाचे पैसे न देता शेतकऱ्यांना चकरा मारायला लावले जाईल.