कोल्हापूर जिल्ह्यातील तारदाळ (ता. हातकणंगले) येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या रासायनिक खत उत्पादन कारखान्यावर जिल्हा परिषदेचे खत निरीक्षक आणि जिल्हा गुणवत्ता निरीक्षकांच्या पथकाने छापा टाकला.
या कारवाईत पथकाने डायटोमाइट सिलिकॉन खताची २ लाख ८ हजार ३२० रुपयांची २४८ पोती गोदामात सीलबंद केली. या प्रकरणी सुरगोंडा नेमगोंडा पाटील (रा. समडोळी, जि. सांगली, सध्या रा. इचलकरंजी) यांच्या विरोधात शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रसायन कंपनीतून निवृत्त झालेल्या सुरगोंडा पाटील यांनी मगदुम मळा, तारदाळ येथील शिवगोंडा महादेव चौगुले यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना रासायनिक खत उत्पादन कारखाना सुरू केला आहे, अशी माहिती मिळाल्याने जिल्हा गुणवत्ता निरीक्षक संभाजी शेणवे यांनी पंचांना सोबत घेऊन छापा टाकला. त्या ठिकाणी श्री यशोदा केमिकल्स, मु.पो. समडोळी (जि. सांगली) यांनी उत्पादित आणि विक्री केली आहे.
अशा मजकुराच्या भगव्या लालसर रंगाची ४० किलो वजनाची रासायनिक खताची २४८ पोती मिळून आली. दरम्यान, सुरगोंडा पाटील यांनी २ फेब्रुवारी २०२२ ला श्री यशोधन केमिकल नावाने सिलिकॉन खत उत्पादनाच्या व्यवसायासाठी भाडेकरार केला असून खत उत्पादनाचा परवाना २०१७ मध्ये उद्योग भवन सांगलीतून घेतला आहे.
त्याची मुदत २०२२ मध्ये संपली आहे. खत नियंत्रण आदेशाचे उल्लंघन करून रासायनिक खताचे उत्पादन केले आहे.. त्यामुळे सुशांत बाजीराव लव्हटे (वय ३१, रा. कसबा बावडा) यांच्या फिर्यादीनुसार सुरगोंडा पाटील यांच्या विरोधात शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तारदाळ (ता. हातकणंगले) येथे विनापरवाना खत उत्पादन घेणाऱ्या कारखान्यातील उत्पादित २४८ पोती जप्त केली आहेत. सूरगोंडा पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कृषी विभागाचे भरारी पथक अशा उत्पादनाचा जिल्ह्यात शोध घेत असून शेतकऱ्यांनीही आढळल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा. - सुशांत लव्हटे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी, कृषी विभाग जिल्हा परिषद.