सोलापूर : अतिवृष्टी तसेच पूरग्रस्तांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये मदतनिधी जमा करण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत १३ हजार १९४ बाधितांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे.
काहींच्या बँक खाते क्रमांकात त्रुटी आढळल्यामुळे मदतनिधी जमा होण्यास विलंब झाला आहे. मात्र, संबंधित त्रुटी दूर करून मदतनिधी जमा करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत.
शनिवारी, ४ ऑक्टोबर सायंकाळपर्यंत सर्वांच्या खात्यात मदतनिधी जमा होईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिली.
अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील १४ हजार ७०४ लोकांना मोठा फटका बसला असून, यातील १४ हजार बाधितांना प्रत्येकी दहा हजार रुपये मदतनिधी देण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. या निर्णयानंतर मागील दोन दिवसांपासून निधी जमा करण्याचे काम सुरू झाले आहे.
सध्या १३ हजार १९४ बाधितांच्या खात्यात रक्कम जमा झाली असून, उर्वरित सुमारे १५०० खात्यांमध्ये मदतनिधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच १४४ निवारा केंद्रातून साडेचार हजार बाधित ३ ऑक्टोबरपूर्वी आपल्या घरी परतले आहेत.
तालुकानिहाय वाटप करावयाची रक्कम
उत्तर सोलापूर : ७० बाधित : ७ लाख रुपये
दक्षिण सोलापूर : ४३ बाधित : ४ लाख ३० हजार रुपये
पंढरपूर : ३६ बाधित : ३ लाख ६० हजार रुपये
मोहोळ : ३१० बाधित : ३१ लाख रुपये
माढा : १,०५० बाधित : १ कोटी ५० लाख रुपये
तालुकानिहाय चारा
माढा : १०० टन
मोहोळ : २० टन
दक्षिण सोलापूर : १० टन
उत्तर सोलापूर : १९ टन
पूरग्रस्त भागात चारा टंचाई भासू नये किंवा त्यामु त्यामुळे जनावरांची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पूरग्रस्त तालुक्यात मुबलक चारा उपलब्ध करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच मदतनिधी वाटपाचे काम अंतिम टप्प्यात असून, मदतीपासून कुणीही वंचित राहू नये, याची खबरदारी घेतली आहे. - जयकुमार गोरे, पालकमंत्री, सोलापूर
अधिक वाचा: पाणंद रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी शासन घेतंय 'हा' महत्वपूर्ण निर्णय; लवकरच जीआर काढणार