दत्ता पाटील
तासगाव : मागील पाच वर्षात द्राक्षातील उत्पादन खर्चात तिपटीने वाढ झाली आहे. पाच वर्षांपूर्वी एक ते दीड लाख रुपये लागणारा खर्च सध्या साडेतीन ते साडेचार लाखांपर्यंत गेला आहे.
याउलट द्राक्षांची परिस्थिती असून पाच वर्षांपूर्वी २०० ते ३०० रुपयांना चार किलो विक्री होणारी द्राक्षे १०० ते १५० रुपयांप्रमाणे विकली जात आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च देखील मिळत नसल्याने द्राक्ष बागेचे अर्थकारण कोलमडले आहे. परिणामी दरवर्षी द्राक्ष उत्पादक कर्जाच्या खाईत जात आहे.
एकेकाळी सर्वाधिक नफा मिळवून देणारे पीक म्हणून द्राक्ष शेतीकडे पाहिले जात होते. पाच वर्षांपूर्वीपर्यंत वर्षाकाठी एक ते दीड लाख रुपये खर्च केल्यानंतर बागेतून चार ते सहा लाख रुपये उत्पन्न मिळत होते.
मात्र, मागील पाच वर्षांत सातत्याने बसणारा हवामान बदलाचा फटका, द्राक्ष उत्पादकांच्या बाबतीत शासनाची उदासीन भूमिका, खते, औषधांच्या वाढत्या किमती, शेतमजुरांचे वाढलेले दर यामुळे उत्पादन खर्चात तिपटीने वाढ झाली आहे.
सध्या एक एकर द्राक्षबाग पिकवण्यासाठी साडेतीन ते साडेचार लाख रुपये खर्च करावा लागतो. शेतीपूरक साधनसामग्रीवर कोणतीही सवलत नसल्यामुळे शेतकऱ्यांना द्राक्षबाग जगण्यासाठी भरमसाट खर्च करावा लागत आहे.
शेतमजुरीच्या दरातही मागणी वाढल्यामुळे तिपटीने वाढ झाली आहे. दुसऱ्या बाजूला चार वर्षांपूर्वी चार किलोंच्या पेटीला दोनशे रुपयांपासून तीनशे रुपये दर मिळत होता. त्यामुळे बागेत दुप्पट-तिप्पट नफा होत होता.
मात्र, गेल्यावर्षी चार किलोंच्या पेटीला १०० ते १५० रुपयांपर्यंतच दर मिळाला होता. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांनी वर्षभरात केलेला खर्च निघत नाही.
यंदा उत्पादनातही घट
दरवर्षी अवकाळी पावसाने नुकसान होत असताना झालेले उत्पादनात दर कमी असल्यामुळे नुकसान होत होते. यावर्षी चार महिने पावसाळा राहिल्याने द्राक्षाच्या उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे यावर्षी चार लाख खर्च केल्यानंतर एक लाख तरी मिळतील का? याची चिंता द्राक्ष उत्पादकांना सतावत आहे. सप्टेंबरपूर्वी आगाप फळ छाटणी घेतलेल्यांचा हंगाम सुरू आहे. या द्राक्षांना यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत चार किलोला शंभर रुपये दर जादा मिळाला आहे. मात्र, उत्पादन घटल्याने एक लाख रुपये उत्पन्न मिळाल्याचे बागायतदार सांगतात.
सरासरी एकरी द्राक्षबागेचा खर्च अंदाजित (रुपये)
कीटकनाशके/बुरशीनाशके : ७५,०००
खते : ७५,०००
पीजीआर कंपनीची औषधे : १,००,०००
मजुरी : १,००,०००
एकूण : ३,५०,०००
मागील तीन वर्षांतील सरासरी द्राक्ष दर (प्रति चार किलो पेटीस)
२०२३-२४ : ११० ते १७०
२०२२-२३ : १३० ते २००
२०२१-२२ : १५० ते २३०
२०२०-२१ : २०० ते ३००
अधिक वाचा: जुन्या आंबा बागेचे उत्पादन वाढविण्यासाठी कोंकण कृषि विद्यापीठाचा महत्वाचा सल्ला