कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या चमूने जळगाव जिल्हाभरातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर संबंधित कुटुंब शासकीय योजनांपासून दूर असल्याचे स्पष्ट झाले.
६९ कुटुंबे सावकारीच्या जाळ्यात अडकल्याचे उघड होताच जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना मदतीचा हात दिला आणि जिल्हा उपनिबंधकांच्या वतीने या कुटुंबांना अवैध सावकारीच्या जाळ्यातून मुक्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
गेल्या वर्षी विद्यापीठातील समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचे सर्वेक्षण केले होते. त्यातून त्यांच्या अडीअडचणी नोंदवून घेतल्या. तसेच शासकीय योजनांसह अन्य प्रक्रियेचीदेखील नोंद घेण्यात आली. तो अहवाल तत्कालीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिला होता.
'प्रोजेक्ट हार्वेस्ट'च्या मोहिमेंतर्गत मिळालेले लाभ
| लाभ | लाभार्थी | लाभ वाटप |
| वृद्धपकाळ योजना | ११० | ४५ |
| संजय गांधी योजना | २४० | ११७ |
| आरोग्य सहायता | ९६ | ९५ |
| घरकुल | ७७ | ४३ |
| गृहभेटी | ३०२ | ३०० |
| शिवणयंत्र वाटप | १५ | ०० |
| रोजगार मेळावा | ८४ | ०० |
| व्यवसाय उभारणी | ७७ | १७ |
| बालकांना शिक्षण | ०३ | ०३ |
| समुपदेश | ०२ | ०१ |
| सावकारी मुक्तता | ६९ | ६९ |
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंब अवैध सावकारीच्या पाशात अडकल्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर तातडीने कार्यवाही करण्यात आली. त्यातून अवैध सावकारी करणाऱ्यांवर ताकीदसह अन्य कारवाई केली आहे. त्यामुळे ६९ कुटुंबांना कर्जातून मुक्ती मिळाली आहे. - गौतम बलसाणे, जिल्हा उपनिबंधक जळगाव.
