Join us

बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी तब्बल ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर; केल्या जाणार 'ह्या' उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:29 IST

bibtya attack शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका १३ वर्षीय मुलाचा बळी गेल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे.

पुणे : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका १३ वर्षीय मुलाचा बळी गेल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी स्वतंत्र बैठका घेत वेगवेगळे निर्देश दिले.

त्यानुसार पवार यांनी बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी आणि मानव-बिबट संघर्षावर नियंत्रण आणण्यासाठी तब्बल ११ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

मनुष्यहानी रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. जुन्नर वन विभागात ६११.२२ चौ.कि.मी. क्षेत्र आहे. ज्यात जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या चार तालुक्यांचा समावेश आहे.

घोड, कुकडी, माणिकडोह, पिंपळगाव जोगा यांसारख्या सिंचन प्रकल्पांमुळे या भागात ऊस, केळी, द्राक्ष, डाळिंब यांसारखी दीर्घकालीन बागायती पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात.

या बागायती पिकांमुळे बिबट्यांना लपण्यासाठी निवारा, पाणी आणि भक्ष्य सहज उपलब्ध होते. परिणामी या भागात बिबट्यांचा स्थायिक अधिवास निर्माण झाला असून, अंदाजे १५०० बिबट्यांचा अधिवास असण्याची शक्यता आहे.

बिबट्यांची संख्या वाढल्याने त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी व हल्ल्याच्या घटना घडू नयेत. यासाठी दीर्घ व अल्पकालीन उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील. युद्धपातळीवर या परिसरात वन विभागांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल.

२० विशेष रेस्क्यू टीम कार्यरत◼️ या मंजूर निधीतून जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात २० विशेष रेस्क्यू टीम कार्यरत होणार असून, प्रत्येक टीममध्ये प्रशिक्षित नेमबाज, शोधक, ट्रॅक्युलायझिंग गन, रेस्क्यू वाहने, अत्याधुनिक कॅमेरे, पिंजऱ्यांसह आवश्यक उपकरणांचा समावेश असेल.◼️ या मोहिमेत ५०० पिंजरे, २० ट्रॅक्युलायझिंग गन, ५०० ट्रॅप कॅमेरे, २५० लाइव्ह कॅमेरे, ५०० हाय-पॉवर टॉर्च, ५०० स्मार्ट स्टिक, २० मेडिकल इक्विपमेंट किट्स यांसह प्रत्येक टीमसाठी ५-६ प्रशिक्षित सदस्य असणार आहेत.

बिबट्यांना पकडून इतरत्र स्थलांतर◼️केंद्र सरकारच्या परवानगीने या परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचे स्थलांतर वनतारा, इतर राज्यात किंवा ज्यांना अधिकार आहे, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी सोय उपलब्ध आहे, तेथे पाठविण्यात येतील.◼️ वनाशेजारील शेतीला व गोठ्यांना विद्युत तारांचे कुंपण लावणे, एआयच्या माध्यमातून बिबट्यांची हालचालीची माहिती नागरिकांना कळविणे, शेतीला दिवसा पूर्ण ताकदीने वीजपुरवठा करणे आदी उपाययोजना करण्याच्या सूचना आज देण्यात आल्या आहेत.

साहित्य पुरविण्याचे निर्देश◼️ बिबट्यांना पकडण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून तातडीने २०० पिंजरे खरेदी करण्यात येतील. त्याशिवाय वन विभागाच्या निधीतून आणखी १ हजार पिंजरे तातडीने खरेदीसाठी १० कोटींचा निधी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.◼️ वन विभागाला लागणारी वाहने, पिंजरे व इतर साहित्य तातडीने पुरविण्याचे व त्यासाठी लागणारा निधी देण्याचे निर्देश नाईक यांनी यावेळी दिले. कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता पडू न देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

अधिक वाचा: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मार्ग मोकळा; कर वसुलीची अट शिथिल, आता किती वेतन मिळणार?

टॅग्स :बिबट्याशेतकरीशेतीजंगलवनविभागराज्य सरकारसरकारजुन्नरअजित पवारपुणेआंबेगावखेडशिरुर