वार्शी : सोन्याचा भाव गगनाला भिडलेला आहे. अशातच सर्वसामान्य व्यक्ती सोने खरेदीचा विचारही करत नाही. अतिवृष्टीत मेटाकुटीला आलेला शेतकरी दिवाळीत दोन गोड घास खाता यावे म्हणून ज्वारी आडत बाजारात विक्रीला आणली.
आडत व्यापाऱ्याला या ज्वारीच्या पोत्यात मणीमंगळसूत्रसह चार तोळे दागिन्यांचा डबा हाती लागला. म्हसोबा वाडीच्या शेतकऱ्याला बोलावून चार तोळे दागिन्याचा डबा त्याच्या हाती ठेवताच शेतकऱ्याचे डोळे पाणावले.
ही घटना घडली बार्शी येथील बाजार समितीत. लक्ष्मण भानुदास कात्रे (रा. म्हसोबाचीवाडी, ता. वाशी, जिल्हा धाराशिव) असे दागिने परत मिळालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
कात्रे यांनी आयुष्यभर कष्ट करून पै-पै जमा करुन स्त्रीधन उभारले. हे दागिने एका स्टीलच्या डब्यात ठेऊन तो ज्वारीच्या एका पोत्यात ठेवून दिला.
अतिवृष्टीला तोंड देत असताना दिवाळीचा सण आला. घरात परिस्थिती बिकट असल्याने या सणासाठी पैशाची गरज भासली.
गडबडीत त्याने घरातील तीन पोती ज्वारी बार्शीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती येथील हनुमान लीला ट्रेडिंग कंपनीत अमोल ज्ञानदेव कानकात्रे यांच्या आडतीत टाकली.
आडत्याने त्या ज्वारीच्या पोत्यांची पलटी मारत असताना अमोल कानकात्रे व दुकानातील मुनीम रवींद्र गादेकर यांना स्टीलचा डबा मिळाला.
तो डबा उघडून पाहता त्यात सोन्याचे मंगळसूत्र, गंठण, कर्णफुले असे ५ लाख २० हजार रुपयांचे चार तोळे सोन्याचे दागिने आढळले. त्याने तातडीने संबंधित शेतकऱ्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.
आयुष्यभराची कमावलेली पुंजी अनावधानाने हरवलेली पण आडत दुकानदार कानकात्रे यांच्या प्रामाणिकपणामुळे परत मिळाली.
अधिक वाचा: इंजिनिअरचे १४ लाखांचे पॅकेज सोडून धनराज पाटलांनी सुरु केले पशुपालन; मिळविले १ तोळे सोन्याचे बक्षीस
