मल्लिकार्जुन देशमुखे
मंगळवेढा : जिल्ह्यात ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात ज्वारीच्या क्षेत्रात दरवर्षी वाढ होत असून, यंदा तब्बल १९ हजार ५७३ हेक्टरवर पीक आहे.
उत्पादन खर्चाच्या मानाने अजूनही पुरेसा ज्वारीस दर मिळत नाही. हंगामाच्या अगोदर चढे असणारे दर नवीन ज्वारी बाजारात येण्यास सुरुवात होताच गडगडतात. यामुळे ज्वारीच्या कोठारात ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांची साडेसाती संपणार कधी? असा प्रश्न शेतकरी विचारू लागलेत.
तालुक्यात रब्बी हंगाम सर्वांत मोठा असतो. यावर्षी रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ३५ हजार ४५७ हेक्टर निश्चित करण्यात आलेले, परंतु ज्वारी पिकास दर कमी मिळत असल्याने यावर्षी १९ हजार ५७३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. यावर्षी ज्वारीच्या क्षेत्रात मोठी घट झाल्याचे दिसून आले.
बोराळे, मुंढे वाडी, ब्रहापुरी, मंगळवेढा शिवारात ज्वारीचे पीक अधिक घेण्यात येते. पण, मागील दोन वर्षांच्या काळात ज्वारीच्या दरात वरचेवर होत असलेली घसरण, मशागत काढणी मळणीचा वाढता खर्च पाहता शेतकरी ज्वारी सोडून हरभरा, करडईसह इतर पिकाकडे वळत आहे.
यंदा पाऊसमान चांगले झाल्याने ज्वारीचे उत्पादन चांगले आहे, मात्र नवी ज्वारी मार्केटला येण्यास सरुवात होताच ज्वारीच्या दरात मोठी घसरण झाली. शेतकऱ्यांना काढणी, मळणीस आर्थिक गरज असल्याने शेतकरी लगेच ज्वारी विक्रीस आणतात. मात्र, दर पडल्याने नव्या ज्वारीला यंदाही 'साडेसाती' लागली.
उत्पादन खर्च वाढला, उत्पन्नात मात्र घट
ज्वारी उत्पादनासाठी काढणी व मळणी वगळता प्रतिएकरी हजारोंचा खर्च करावा लागतो. चार वर्षांपूर्वी (२०२०-२१) नांगरणीचा खर्च १२०० रुपये, बियाणे प्रतिबॅग १८०० ते २२००, युरिया २४०, डीएपीसह मिश्रखते १०५० ते ११३० रुपयांना मिळत होती, तर दोनवेळच्या तणनाशकांचा खर्च १६००, तर तीनवेळा कीटकनाशक फवारणीचा खर्च तीन हजार रुपयांपर्यंत होता. काढणीसाठी सहा हजारांपर्यंत, तर मळणीसाठी प्रतिपोते ८० रुपयांचा दर होता. त्यात दुपटीने वाढ झाली आहे. वाढत्या महागाईच्या तुलनेत ज्वारीच्या दरात फारशी वाढ न झाल्याने नुकसान सोसावे लागत आहे.
पाच वर्षात एकदाच ६ हजारांपुढे भाव
वर्ष | भाव | वर्ष | भाव |
२०१९ | ३५०० | २०२२ | ३००० |
२०२० | ३१०० | २०२३ | ५४०० ते ६००० |
२०२१ | २२०० | २०२४ | २८०० |