अरुण बारसकर
राज्यातील १५ साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई केली असली तरी आजही ९५ साखर कारखानेऊस उत्पादकांचे १४३२ कोटी रुपये देणे आहेत. एकट्या सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी २८६ कोटी, तर धाराशिव जिल्ह्यात ८० कोटी रुपये थकविले आहेत.
राज्यात सरलेल्या हंगामात गाळप केलेल्या २०० पैकी १०५ साखर कारखान्यांनी गाळपाला आणलेल्या संपूर्ण उसाचे पैसेच दिले नाहीत. राज्यातील २०० साखर कारखान्यांनी ३ एप्रिलपर्यंत ८४८ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केला आहे. साखर आयुक्त कार्यालयाकडील अहवालानुसार १५ मार्चपर्यंत ८४४ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले होते.
त्या उसाचे २१ हजार ४३ कोटी शेतकऱ्यांना द्यायचे आहेत. प्रत्यक्षात काही साखर कारखान्यांनी एफआरपीच्या १०० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम दिल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर २१ हजार ४३६ कोटी रुपये जमा झाले आहेत.
काही साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिक रक्कम दिली असली तरी ९५ साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कमही दिलेली नाही. या ९५ साखर कारखान्यांकडे १४३२ कोटी रुपये थकले आहेत. यातीलच १५ साखर कारखान्यांची आरआरसीनुसार कारवाई केली आहे. या १५ साखर कारखान्यांकडे ३७३ कोटी रुपये थकले आहेत.
एफआरपीपेक्षा अधिक दर
• अनेक साखर कारखानदारांना एफआरपीची रक्कमही देणे अवघड झाले असताना काही साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा ३९३ कोटी रुपये अधिक रक्कम ऊस उत्पादकांना दिली आहे.
• असे १४ साखर कारखाने आहेत, त्यांनी एफआरपीच्या ६० टक्क्यांपर्यंत रक्कम ऊस उत्पादकांना दिली आहे. ३१ साखर कारखान्यांनी ८० टक्क्यांपर्यंत, तर ५० साखर कारखान्यांकडे किरकोळ रक्कम राहिल्याचे सांगण्यात आले.
• १४३२ कोटी थकबाकीत सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखान्यांपैकी सर्वाधिक ३६५ कोटी थकले आहेत.
साखर कारखान्यांवर कडक कारवाई करण्याचे कायद्यात नसल्याने व आरआरसी शिवाय कसलीच कारवाई होत नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देत नाहीत. आरआरसी कारवाईत साखर कारखान्यांचे नुकसान होत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्रास दिला जातोय. - प्रा. सुहास पाटील, सदस्य, ऊस दर नियंत्रण समिती.
हेही वाचा : अनिलरावांना रिकाम्या शेताने दिला मोठा आधार; पपईतील आंतरपीक खरबुजने केले मालामाल