Join us

केळी पिकाचे ८ हजार हेक्टर क्षेत्र धोक्यात; अनेक केळी बागांवर शेतकऱ्यांना रोटावेटर फिरविण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 17:47 IST

उजनी धरण या वर्षी शंभर टक्के भरल्यामुळे दहिगावचे तीन आवर्तन मिळणार, या आशेने करमाळा तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी १५ हजार एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली.

करमाळा : उजनी धरण या वर्षी शंभर टक्के भरल्यामुळे दहिगावचे तीन आवर्तन मिळणार, या आशेने करमाळा तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी १५ हजार एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली.

मात्र यंदा १२ एप्रिलपासूनच योजनेचे पाणी बंद झाल्यामुळे उभ्या केळीच्या बागा जळून जात असल्याने अनेक उत्पादकांनी पिकावर रोटावेटर फिरवला. यामुळे करमाळा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे तब्बल २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

उजनी धरणाचेपाणीवाटप चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी धरण उशाला अन् कोरड घशाला असा अनुभव आला आहे.

एक एकरातून किमान तीन लाखांचे उत्पन्न मिळते. लागवड झालेल्या १५ हजार एकर क्षेत्रापैकी विहीर व बोअरवेलच्याच्या पाण्यामुळे पाच ते सहा हजार एकर केळी वाचतील, मात्र आठ हजार एकर क्षेत्र केळीचे पीक जळू लागले आहे.

काहींनी आता रोटावेटर फिरवून केळीचा फड मोडण्यास सुरुवात केली आहे. २०० मीटर पाणी दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या जॅकवेलपासून खाली गेले आहे. त्यामुळे अनेक उत्पादक धास्तावले आहेत.

एकरी दीड लाख खर्च◼️ करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्षेत्रात वरकटणे, सरपडोह, गुळसडी, निंभोरे, घोटी, साडे, कुंभेज, सौंदे, कोंढेज अशी जवळपास पंधरा गावांच्या शिवारात शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली आहे.◼️ एक एकर क्षेत्र केळी लागवड करण्यासाठी शेतकऱ्याला किमान दीड लाखापर्यंत खर्च आला आहे.◼️ केळीची वाढ ही चांगली झाली, मात्र अचानक दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी बंद झाल्यामुळे केळीच्या बागा जागेवरच जळत आहेत.◼️ करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्षेत्रात वरकटणे, सरपडोह, गुळसडी, निंभोरे, घोटी, साडे, कुंभेज, सौंदे, कोंढेज अशा १५ गावांच्या शिवारात केळीची लागवड झाली आहे. एक एकर लागवडीसाठी किमान दीड लाखापर्यंत खर्च येतो.

माझी १६ एकर केळीची बाग दहिगावच्या पाण्यावर बाग भिजत होती. यापैकी सात एकर केळीवर रोटावेटर फिरवला आहे. आठ-पंधरा दिवसांत पाण्याची व्यवस्था झाली नाही तर राहिलेली केळीबाग मोडून टाकावी लागेल. किमान ८० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करून भरपाई द्यावी. - अतुल मस्कर, केळी उत्पादक, बरकटणे, ता. करमाळा

अधिक वाचा: सातबारा होणार आता अधिक स्पष्ट आणि सुटसुटीत, होतायत हे बदल; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :केळीशेतकरीशेतीसोलापूरपाणीफलोत्पादनउजनी धरणधरणपीक