सोलापूर : अतिवृष्टी, महापुराने झालेले पीक नुकसान तसेच रब्बी हंगाम बियाणे अनुदान वाटप अद्यापही सात लाख ४० हजार शेतकऱ्यांचे ७२० कोटी पाच लाख रुपये झालेले नाही.
ही आकडेवारी १९ नोव्हेंबरपर्यतची आहे. याशिवाय खरडून गेलेल्या जमिनीच्या ५७ कोटी ५९ लाख रुपयाला शासनाने मंजुरी दिली नाही. यामुळे जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुराने सात लाख ६४ हजार शेतकऱ्यांना ८६७कोटी ३८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. रब्बी हंगाम बियाणे खरेदीसाठी सात लाख ९२ हजार शेतकऱ्यांना ६५२ कोटी सात लाख रुपये मंजूर झाले आहेत.
ही मंजूर झालेली रक्कम १९ ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्यापासून चार आदेशान्वये जिल्ह्यासाठी रक्कम मंजूर झाली असली तरी मंजूर रक्कम संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही.
ऑगस्ट महिन्यात मंजूर न झालेल्या अतिवृष्टीच्या ६० कोटींचेही वाटप पूर्ण झाले नाही. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यासह राज्यात पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले.
शासनाने कोटीने रक्कम मंजूर केली असली तरी मंजूर रकमेपैकी ५० टक्क्यांपर्यंत रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. खरडून गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई अद्याप मंजूर झाली नाही.
शेतकऱ्यांकडून रक्कम जमा होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पुरामुळे खरडून गेलेली जमीन अद्याप पिकाखाली आली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
खरडून गेलेल्या जमिनीच्या रकमेसाठी प्रतीक्षा..
◼️ सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व महापुराने नुकसान झालेल्या पिकांपोटी ७ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना ८६७ कोटी ३८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी ४ लाख ३७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ५३३ कोटी ४१ लाख रुपये जमा झाले आहेत.
◼️ रब्बी हंगाम बियाणासाठी सात लाख ९२ हजार शेतकऱ्यांसाठी ६५२ कोटी सात लाख रुपये मंजूर आहेत. त्यापैकी तीन लाख ८० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ३३८ कोटी ५९ लाख रुपये जमा झाले आहेत.
◼️ जमीन खरडून गेलेल्या २० हजार ४४१ शेतकऱ्यांच्या १२ हजार ४६० हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीपोटी ५७ कोटी ५९ लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. ही रक्कम शासनाकडून अद्याप मंजूर झाली नाही.
अधिक वाचा: जमिनीच्या वाटणीपत्रास मिळणार आता कायदेशीर आधार; भूमिअभिलेख विभागाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय
