सोलापूर : खाते मिसमॅच, फार्मर आयडी, ई- केवायसी व अन्य कारणे लावून गेल्या २४ दिवसांपासून जिल्ह्यातील चार लाख २३ हजार (बियाणासाठीचे चार लाख ३८ हजार वगळून) शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूर नुकसानभरपाई रकमेसाठी तिष्ठत ठेवले आहे.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत झालेल्या नुकसानीची रक्कम मंजूर झाली खरी, मात्र पैसे कधी जमा होणार असे विचारले असता थेट मुंबईकडे बोट दाखविले जात आहे.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व आलेल्या महापुरामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. याची माहिती शासनाकडे गेल्यानंतर लागलीच रक्कम मंजूर करीत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरणासाठी वर्ग करण्यात आली.
शासनाने घाई गडबडीने ज्यांच्यासाठी रक्कम मंजूर केली, त्या शेतकऱ्यांना मात्र पैशांकडे डोळे लावावे लागत आहेत.
शेतकऱ्यांचे खाते मिसमॅच आहे, फार्मर आयडी नाही, ई-केवायसी काढली नाही व इतर कारणे लावून शेतकऱ्यांची यादी शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला परत पाठवली जात आहे.
संबंधित तालुक्याचे तहसील कार्यालय शेतकऱ्यांच्या खात्यातील त्रुटी पूर्ण करून देत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत.
साधारण मंजूर शेतकऱ्यांपैकी ४० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत, तर ६० टक्के शेतकरी पैशांच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत जिल्हा पातळीवर चौकशी केली असता, मुंबईकडे बोट दाखविले जात आहे.
अद्याप ६० टक्के शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नाही
◼️ पंचनाम्यातील क्षेत्राप्रमाणे राज्य शासनाने तातडीने रक्कम मंजुरीचे आदेश काढून रक्कमही वितरणासाठी वर्ग केली आहे. मात्र, रक्कम जमा होण्यास दिरंगाई होत आहे.
◼️ दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करूनही अद्यापही ६० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत.
◼️ १२ सप्टेंबरच्या आदेशानुसार जिल्ह्यासाठी ५९ कोटी ८० लाख रुपये मंजूर आहेत. आतापर्यंत ४१ कोटी २४ लाख ३८ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.
◼️ १८ ऑक्टोबरच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सहा लाख ७८ हजार ५९२ ३ शेतकऱ्यांना ७७२ कोटी ३६ लाख ४४ हजार रुपये मंजूर असून, आतापर्यंत तीन लाख ५५ हजार शेतकऱ्यांची ३७५ कोटी ५४ लाख रुपये इतकी रक्कम जमा झाली नाही.
◼️ २० ऑक्टोबरच्या आदेशात ८५ हजार ५८१ शेतकऱ्यांना ९५ कोटी एक लाख १९ हजार रुपये मंजूर आहेत. त्यापैकी ६८ हजार शेतकऱ्यांची ८२ कोटी ६४ लाख रुपये अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत.
◼️ ४ नोव्हेंबरच्या आदेशात जिल्हासाठी सात लाख ९२ हजार शेतकऱ्यांना ६५२ कोटी सात लाख रुपये मंजूर आहेत. त्यापैकी मंगळवारपर्यंत चार लाख ३८ शेतकऱ्यांची ३३८ कोटी ३४ लाख रुपये इतकी रक्कम खात्यावर जमा झाली नाही.
अधिक वाचा: महसूल विभागाचे नवे आदेश, आता सात दिवसांत मिळणार शेतरस्ता; जाणून घ्या सविस्तर
