कोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, ५३४ पैकी ४३९ साखर कारखान्यांचा हंगाम संपला आहे. अद्याप ९५ कारखाने सुरू असून, त्यातील ४८ कारखाने हे एकट्या उत्तर प्रदेश राज्यातील आहेत.
या हंगामात आतापर्यंत २४८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० लाख टनाने साखर उत्पादन कमी होईल.
यंदा महाराष्ट्रात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गळीत हंगाम सुरू झाला असला तरी इतर राज्यात कारखाने वेळेत सुरू झाले होते. देशातील ५३४ कारखान्यांनी हंगाम घेतला.
देशभरातच उसाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. या कारखान्यांनी मार्च अखेर २६ कोटी ५० लाख टन उसाचे गाळप करत २४८ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.
गेल्या वर्षी मार्च अखेर २९ कोटी ८० लाख टन उसाचे गाळप होऊन ३०२ लाख टन साखरेचे उत्पादन होते. त्या तुलनेत यंदा खूप मोठा फटका कारखान्यांना बसला आहे.
हंगामाच्या शेवटी २५९ लाख टनापर्यंतच साखर उत्पादन थांबेल, असा अंदाज आहे म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० लाख टनाने उत्पादन घटणार आहे.
गेल्या वर्षीपेक्षा ०.७८ टक्क्यांनी उतारा घटला
गेल्या वर्षी देशातील कारखान्यांचा १०.१५ टक्के उतारा होता. इथेनॉल उत्पादनासह यंदा ९.३७ टक्के असून, ०.७८ टक्क्यांनी कमी झाला आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश व कर्नाटकात ०.८५ टक्क्यांनी उतारा घटला आहे.
राज्यनिहाय साखरेचे उत्पादन
राज्य | कारखाने बंद | कारखाने सुरु | साखर उत्पादन (लाख टन) |
उत्तर प्रदेश | ७४ | ४८ | ८७.५० |
महाराष्ट्र | १९४ | ०६ | ८०.०६ |
कर्नाटक | ७८ | ०२ | ३९.५५ |
गुजरात | ०९ | ०६ | ८.२१ |
तामिळनाडू | १४ | १६ | ४.१६ |
इतर | ७० | १७ | २८.३० |
अधिक वाचा: Sugarcane FRP : सोमेश्वर कारखान्याचा यंदा ऊस गाळपाबरोबर एफआरपी देण्यातही उच्चांक