सोलापूर जिल्ह्यात प्रथमच ३८ साखर कारखाने गाळपासाठी सज्ज झाले असून, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उसाच्या क्षेत्रात ८३ हजार हेक्टरने वाढ झाल्याची कृषी खात्याची आकडेवारी आहे.
वाढलेले उसाचे क्षेत्र व पडणाऱ्या चांगल्या पावसामुळे यंदा उसाचे गाळप उच्चांकी होण्याचा अंदाज आहे. धाराशिव जिल्ह्यातही यंदा उसाच्या क्षेत्रात बावीस हजार हेक्टरने वाढ झाली आहे. राज्याचा गाळप हंगाम लवकरच सुरू होण्याचा अंदाज आहे. तशी तयारीही सुरू आहे.
सोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या ४० इतकी असून, वैराग येथील 'संतनाथ' व अक्कलकोटचा 'श्री स्वामी समर्थ' सहकारी साखर कारखाना यंदा सुरू होण्याची शक्यता नाही. मात्र, 'लोकवस्ती' सह ३८ साखर कारखाने सुरू करण्याची तयारी सुरू आहे. मागील वर्षी ऊस व अन्य कारणांमुळे बंद असलेले 'मकाई', 'आदिनाथ' व इतर कारखानेही सुरू होतील, असे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात मागील वर्षी पाऊस चांगला पडल्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली होती. त्यामुळे मागील वर्षीचा खोडवा व मागील वर्षीची नव्याने झालेली लागवड यामुळे उसाचे क्षेत्र वाढले आहे.
८३ हजार हेक्टर वाढले
मागील वर्षी कृषी खात्याकडे एक लाख एकावन्न हजार हेक्टरची नोंद होती. प्रत्यक्षात एक लाख २९ हजार हेक्टर ऊसतोडणी झाल्याची साखर कारखान्यांकडे नोंद झाली आहे. मागील वर्षी तोडणी झालेले व यंदा कृषी खात्याकडे नोंदलेले क्षेत्र पाहता ८३ हजार हेक्टर ऊस क्षेत्र वाढल्याचे दिसत आहे.
तालुक्याचे नाव | ऊस क्षेत्र २४-२५ | ऊस क्षेत्र २५-२६ |
उ. सोलापूर | ३०१३ | ६२९० |
द. सोलापूर | १८१८० | १४९२६ |
बार्शी | ७६१७ | ४३१७ |
अक्कलकोट | २८६१ | २३२४२ |
मोहोळ | १३१३० | २३६९६ |
माढा | १७१५१ | ३१०९४ |
करमाळा | २९२७६ | २३४८१ |
पंढरपूर | २८५५७ | ४८१३६ |
सांगोला | ३६१५ | ४९४८ |
माळशिरस | १९०८१ | १९९५८ |
मंगळवेढा | ८१०८ | ११९९९ |
एकूण | १५०५८६ | २१२०८७ |