सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना येत्या गाळप हंगामासाठी पूर्णपणे सज्ज झाला असून, ३५ हजार एकरांवरील साडेबारा लाख टन सभासदांचा आणि दीड ते दोन लाख टन गेटकेन ऊस अशा एकूण १४ लाख टन उसाचे गाळप करण्याचे नियोजन आहे.
विजयादशमीच्या मुहूर्तावर कारखान्याचा ६४ वा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ पार पडला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सभासद, ऊसतोडकामगार, वाहतूकदार, अधिकारी-कर्मचारी आणि संचालक मंडळाच्या सहकार्याने हंगाम यशस्वी करण्याचा विश्वास व्यक्त केला.
बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, त्यांच्या पत्नी रोहिणी जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे आणि त्यांच्या पत्नी प्रतीक्षा कांबळे यांच्या हस्ते झाला.
यावेळी राजवर्धन शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे, संचालक संग्राम सोरटे, ऋषिकेश गायकवाड, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्यासह संचालक मंडळ, कामगार आणि अधिकारी उपस्थित होते.
हंगामाची तयारी पूर्ण; हार्वेस्टरचा वापर वाढवला
◼️ सोमेश्वर कारखान्याकडे ३५ हजार एकर ऊस क्षेत्राची नोंद असून, यापैकी ३१ हजार ५०० एकरांतून ऊस उपलब्ध होईल.
◼️ हंगामासाठी २२६० बैलगाड्या, ६२० डम्पिंग-ट्रॅक्टर, ३९१ ट्रॅक्टर आणि २० ट्रक यांचे करार पूर्ण झाले आहेत.
◼️ मजूर टंचाई लक्षात घेता, कारखान्याने प्रथमच २४ हार्वेस्टरशी करार केले आहेत.
◼️ हार्वेस्टरमुळे शेतकऱ्यांचे नुकसान कमी होऊन जमिनीचा पोत सुधारत असल्याचे जगताप यांनी सांगितले.
◼️ प्रतिदिन ९ हजार ५०० टन क्षमतेने पाच महिन्यांत गाळप पूर्ण होईल.
◼️ शेतकऱ्यांनी पट्टा पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात जास्त उत्पादन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
एआय परिसंवाद
सोमेश्वर कारखान्याने मंगळवार, दि. ७ रोजी ऊस पीक परिसंवादाचे आयोजन केले आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती खर्च कमी, उत्पादन वाढवण्याबाबत केव्हीके आणि व्हीएसआयचे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
अधिक वाचा: पाणंद रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी शासन घेतंय 'हा' महत्वपूर्ण निर्णय; लवकरच जीआर काढणार