सोलापूर : येत्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या ऊस गाळप हंगामासाठी राज्यातील २१४ साखर कारखान्यांनी गाळप परवान्याला अर्ज केले आहेत.
आतापर्यंत एकाही कारखान्याला गाळप परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील ३३ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत.
राज्यातील ११४ सहकारी व ११४ खासगी साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाकडे अर्ज केले आहेत.
शनिवार, १ नोव्हेंबरपासून राज्याचा साखर हंगाम सुरू होणार असला तरी एकाही साखर कारखान्याला परवाना दिला नसल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यात २.१२ लाख मे. टन ऊस क्षेत्र असल्याने तीसहून अधिक साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालणे आवश्यक आहे.
इंद्रेश्वर, सहकार शिरोमणी, मकाई, भीमा यांचे अर्ज नाहीत
◼️ मागील वर्षी गाळप हंगाम घेतलेल्यांपैकी इंद्रेश्वर बार्शी, सहकार शिरोमणी वसंतराव काळे वाडीकुरोली, भीमा सहकारी टाकळी सिकंदर तसेच मागील वर्षी मकाई करमाळा या साखर कारखान्यांनी गाळपासाठी अर्ज केले नाहीत.
◼️ यावर्षी नव्याने पहिल्या हंगामासाठी लोकशक्ती औराद तसेच मागील वर्षी गाळप न घेतलेले कमलाभवानी करमाळा, आदिनाथ करमाळा या साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज दाखल केले आहेत.
◼️ सोलापूर जिल्ह्यातील ३३ साखर कारखान्यांनी अर्ज केले आहेत, शिवाय आणखीन दोन-तीन कारखाने अर्ज करण्याची शक्यता आहे.
◼️ संतनाथ वैराग व स्वामी समर्थ अक्कलकोट हे साखर कारखाने अनेक वर्षांपासून बंद आहेत.
◼️ सिद्धेश्वर सोलापूर, गोकुळ शुगर, मातोश्री लक्ष्मी शुगर, जय हिंद शुगर व सिद्धनाथ शुगरकडे एफआरपीची रक्कम थकली आहे.
अधिक वाचा: कोल्हापुर जिल्ह्यातील 'हे' दोन साखर कारखाने देणार ३४०० रुपयांनी पहिली उचल
