अतिवृष्टी, पावसातील अनियमितता अन् वाढत्या उत्पादन खर्चामुळे पारंपरिक ज्वारी-बाजरीऐवजीशेतकरी मोठ्या प्रमाणावर मका पिकाकडे वळले आहेत.
त्यातून ज्वारी-बाजरीचा कडबा दिसेनासा झाला असून, कडब्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. सध्या कडब्याचे दर तब्बल साडेतीन हजार रुपये शेकडा आहेत. काही भागांत मागणी अधिक असल्याने दरात आणखी वाढ होऊ शकते.
जनावरांच्या दैनंदिन चाऱ्यात कडबा हा प्रमुख आधार असल्याने पशुपालकांना जादा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायाचे संपूर्ण आर्थिक गणित बिघडले आहे.
चाऱ्याच्या खर्चात झालेली वाढ थेट दूध उत्पादनाच्या खर्चावर परिणाम करते. रब्बी हंगामात ज्वारी बाजरीला हवामानाचा मोठा फटका बसतो. अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टीमुळे उभे पीक आडवे होते. कधी कधी दाण्यांची गुणवत्ता घसरते.
कापणी आणि मळणी प्रक्रिया तुलनेने किचकट व खर्चिक असल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त मजुरी खर्च सहन करावा लागतो. त्यातच पक्ष्यांचा वाढता उपद्रव व उत्पादनातील अनिश्चितता, यामुळे जोखीम वाढते.
परिणामी, अनेक शेतकरी अधिक स्थिर उत्पन्न देणाऱ्या मक्याकडे वळले आहेत. बदलत्या हवामानातही तुलनेने मका पीक चांगले तग धरते. सुधारित बियाणे, ठिबक सिंचन व यांत्रिकीकरणामुळे लागवड ते काढणीपर्यंत प्रक्रिया सुलभ झाली आहे.
हेक्टरी उत्पादनात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना सातत्यपूर्ण उत्पन्न मिळण्याची शक्यता वाढली आहे.हिरवा व सकस चारा म्हणूनही मक्याचा वापर होतो, त्यामुळे पशुपालकांकडून त्याला मोठी मागणी आहे.
मक्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे मुरघास (सिलेज) तयार करण्याची संधी. धान्यासोबतच चाऱ्याच्या स्वरूपात विक्री करता येत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी उत्पन्नाची संधी मिळते.
अनेक ठिकाणी मुरघासाला हमी बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने मक्याचे पीक आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे ज्वारी-बाजरीचे लागवड क्षेत्र सातत्याने घटत आहे. परिणामी, कडब्याचा पुरवठा घटला आहे.
३,५०० रुपये शेकडा कडबा
◼️ ज्वारी-बाजरीचा कडबा शोधूनही सापडत नसल्याचे चित्र आहे. लागवड घटल्याने बाजारात पुरवठा कमी झाला असून, मागणी मात्र कायम आहे.
◼️ परिणामी कडव्याचे दर तब्बल ३,५०० रुपये प्रति शेकडा या विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.
◼️ बाहेरील भागांतून कडबा मागवताना वाहतूक खर्चाचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागतो.
ज्वारी-बाजरीची मळणी किचकट
◼️ ज्वारी-बाजरी ही पिके हवामानातील बदलांना तुलनेने अधिक संवेदनशील मानली जातात.
◼️ अवकाळी पाऊस, अतिवृष्टी किंवा जोरदार वाऱ्यामुळे उभे पीक आडवे पडण्याचा धोका असतो, ज्यामुळे उत्पादनात घट येते.
◼️ शिवाय कापणी व मळणी प्रक्रिया तुलनेने किचकट आणि खर्चिक ठरते.
◼️ यांत्रिकीकरण मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्याने वेळ आणि खर्च वाढतो.
पक्ष्यांचा वाढता धोका
◼️ ज्वारी-बाजरी पिकांना पक्ष्यांचा वाढता उपद्रव सहन करावा लागतो.
◼️ दाणे भरताना पक्ष्यांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते, ज्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो.
मकातून दुहेरी उत्पन्न
◼️ पारंपरिक ज्वारी-बाजरीऐवजी मका पिकाला अधिक पसंती दिली जात आहे.
◼️ हिरवा व सकस चारा, तसेच मुरघासासाठी मोठी मागणी असल्याने मक्याला हमी बाजारपेठ मिळते.
◼️ धान्याबरोबरच मुरघासाच्या स्वरूपात विक्रीची संधी उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी उत्पन्नाचा मार्ग खुला होतो.
◼️ अधिक उत्पन्नाच्या अपेक्षेने शेतकरी रब्बी हंगामात मक्याकडे वळत असल्याचे दिसते.
कडब्याचे दर ३,५०० रुपये शेकडा झाल्याने जनावरांचा सांभाळ करणे कठीण झाले आहे. दूध दरात तितकी वाढ नाही, त्यामुळे नफा कमी होत चालला आहे. पर्याय म्हणून मुरघास वापरतो; पण त्यासाठीही अतिरिक्त खर्च करावा लागतो. - प्रवीण जाधव, शेतकरी, जवळा
अधिक वाचा: कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनो तातडीने 'ही' नोंदणी करा; जाणून घ्या सविस्तर
