मोहन डावरे
सोलापूर जिल्ह्याच्या वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखी तळावर भरलेल्या बाजारात पाच हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली होती. यामध्ये सर्वाधिक संख्या बैलांची असून त्यानंतर गाईची आवक झाली होती. मागील वर्षिच्या तुलनेत यंदा जनावरांची आवक वाढली असून जनावरांच्या किमतीसुद्धा वधारलेल्या आहेत. त्यामुळे यंदा जनावरांच्या बाजारात मोठी आर्थिक उलाढाल वाढण्याची अपेक्षा आहे.
वाखरी येथील पालखी तळावर परंपरेनुसार यावर्षीही कार्तिकी जनावरांचा बाजार भरला आहे. या बाजारात खिलार जातीच्या गाय आणि बैलांची तसेच खोंडांची आवक मोठी असते. याशिवाय पंढरपुरी म्हशी आणि रेड्यांची आवक मोठ्या प्रमाणात असते. यंदा सर्वत्र चांगले पाऊसमान झाल्यामुळे जनावरांच्या बाजारात तेजीचे वातावरण दिसून येत आहे.
मागील चार दिवसांपासून बाजारात जनावरांची आवक होत आहे. शनिवारपर्यंत पाच हजारांहून अधिक जनावरांची आवक झाली आहे. यामध्ये २७०० पेक्षा जास्त बैल आणि खोंडांची संख्या आहे. तसेच सुमारे १००० गाई, ७०० म्हशी, ३०० रेडा आणि संकरित गाई अशी सुमारे पाच हजारांपेक्षा जास्त जनावरे दाखल झाली आहेत.
७०० हून अधिक जनावरांची विक्री
पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात प्रसिद्ध आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे. या भागातील व्यापारी मोठ्या संख्येने बाजारात आले आहेत. दोन दिवसांपासून जनावरांची पाहणी, किमतीचे अंदाज घेणे, तोंडी बोलणी करणे अशा प्रमाणात व्यवहार सुरू झालेले आहेत. बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ७०० हून अधिक जनावरांची विक्री झाली आहे.
