Dairy Scheme : विदर्भ–मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून या टप्प्यात अमरावती जिल्ह्याचाही औपचारिक समावेश करण्यात आला आहे. (Dairy Scheme)
दुग्ध उत्पादन वाढवणे, पशुपालकांचे उत्पन्न दुपटीने वाढवणे आणि शेतीपूरक व्यवसायांना चालना देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पशुसंवर्धन, कृषी व सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.(Dairy Scheme)
२ कोटींचा निधी; शेतकऱ्यांसाठी मोठ्या सवलती
या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी अमरावती जिल्ह्याला दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना खालील लाभ मिळणार आहेत.
* ५० टक्के अनुदानावर उच्च उत्पादनक्षम दुधाळ गायींचे वाटप
* शेतकऱ्यांना अधिक दुध देणाऱ्या जातिवंत गायी अत्यंत कमी दरात उपलब्ध होतील.
* ७५ टक्के अनुदानावर आयव्हीएफ गाभण कालवडींचे वितरण
* अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तयार झालेल्या गाभण कालवडींमुळे दूध उत्पादनात मोठी वाढ अपेक्षित.
* विद्युत संचलित कडबा कुटी यंत्र ५० टक्के अनुदानावर.
* पशुखाद्याचे स्वस्त आणि सुलभ उत्पादन शक्य.
* पशुखाद्यावर २५ टक्के अनुदान.
* जनावरांच्या पोषण खर्चात घट.
* १०० टक्के अनुदानावर उच्च प्रतीचे वैरण बियाणे.
* वैरण कमतरता भरून काढण्यासाठी मोठी मदत.
या सर्व लाभांसाठी शेतकऱ्यांना शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.
चाराटंचाई कमी करण्यासाठी 'मूरघास'वर भर
उन्हाळ्यात निर्माण होणारी चाराटंचाई कमी करण्यासाठी प्रकल्पांतर्गत मूरघास निर्मितीला अनुदान दिले जात आहे. यामुळे जनावरांसाठी वर्षभर पौष्टिक चाऱ्याचा पुरवठा शक्य होणार आहे.
दूध संकलन सुरू; मार्केटिंगसाठी थेट करार
शेतकऱ्यांना दुधासाठी स्थिर बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून मराठवाडा दूध उत्पादक कंपनीशी करार करण्यात आला आहे. यामुळे दूध संकलनास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना दुधाला स्थिर दर मिळण्याची शक्यता वाढली आहे.
पशुवंध्यत्व निर्मूलनावरही भर
दूध उत्पादनात घट घडवणारे पशुवंध्यत्व कमी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या अंतर्गत पशुवंध्यत्व निवारण शिबिरे, दूध उत्पादनावरील शास्त्रोक्त प्रशिक्षण, जनावरांना दुधात आणण्यासाठी तज्ञ मार्गदर्शन अशा उपक्रमांची अंमलबजावणी होणार आहे.
बैठकीला डीडीआर शंकर कुंभार, कृषी उपसंचालक वरुण देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी यादव, सहायक पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एन. एम. अवघड, डॉ. एस. व्ही. महल्ले, डॉ. पी. व्ही. सोळंके, जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. एम. जे. आडे व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय कावरे उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वैरण विकास कार्यक्रमांतर्गत १०० टक्के अनुदानावर वैरण बियाण्यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारला जात आहे. यासह वरील प्रकल्पातील योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. - डॉ. संजय कावरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, अमरावती
