संदीप बोडवे
मालवण : कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार Fisherman नौकांना अद्ययावत करण्यासाठी मत्स्य विभागाकडून पावले उचलण्यास सुरुवात झाली आहेत.
या मच्छीमारी नौकांना आधुनिक स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्यात येत असून, यामुळे समुद्रात अडकलेल्या किंवा संकटात सापडलेल्या मच्छीमारी नौकांपर्यंत पोहोचणे आता सहज शक्य होणार आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सुमारे चार हजारांहून अधिक मच्छीमार नौकांसाठी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे. ही यंत्रणा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्त्रो) ISRO कडून विकसित करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत देवगडमध्ये ७८१, मालवण ६२६, व वेंगुर्ला येथे ५३३ नौकांना स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्याचे प्रस्ताव आहेत. याच्या पहिल्या टप्प्यात देवगडमध्ये ८८, मालवण १२९, वेंगुर्ला ३१ मिळून २२१ नौकांना ही यंत्रणा बसविण्यात आली आहे.
आतापर्यंत ७५० सिग्नल यंत्रणा मत्स्य विभागाकडे प्राप्त झाली आहे. एकूण जिल्ह्यातील १९४० मासेमारी नौकांना ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
नौकेवरील नभमित्र अॅपद्वारे नियंत्रण कक्षाकडून संदेश
- आपत्कालीन परिस्थितीत जसे की, नौकेला आग लागणे, नौकेचे इंजिन खराब झाल्यास, नौका समुद्रात बुडत असल्यास, नौकांवरील खलाशांना वैद्यकीय मदत लागल्यास या उपकरणाद्वारे संदेश पाठवता येतो. त्यामुळे मदत मिळण्यास सोपे होते.
- ट्रान्सपॉन्डर उपकरणामध्ये असलेले आपत्कालीन बटन हे थेट नियंत्रण कक्षाशी संपर्क करते.
- त्यामुळे नियंत्रण कक्षाला बोटीच्या समुद्रातील स्थळासह अलर्ट प्राप्त होतो.
- त्यानुसार नौकेवरील नभमित्र अॅपद्वारे नियंत्रण कक्षाकडून संदेश प्राप्त होतो.
इतराशी संपर्क साधने होणार सहज शक्य
१) मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त सागर कुवेसकर लोकमतशी बोलताना म्हणाले, स्वयंचलित नौकांवर स्वयंचलित यंत्रणा बसविण्यात आल्यानंतर मच्छीमारी नौकांवर असलेल्या खलाशी लोकांना इतराशी संपर्क साधने सहज शक्य होणार आहे.
२) ही यंत्रणा उपग्रहाशी जोडलेली असल्याकारणाने खोल समुद्रामध्ये मासेमारी करणाऱ्या खलाशांना सिग्नल नसल्याने होणारा त्रास दूर होणार आहे.
३) सिग्नल या आधुनिक यंत्रामुळे समुद्रात असतानाही कोणतीही आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळण्यासाठी चांगले साधन म्हणून उपलब्ध होणार आहे.
३५० नौकांना ही यंत्रणा बसविली
- दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात २ हजारांहून अधिक नौकांना ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
- या पैकी ८५९ सिग्नल यंत्रणा मत्स्य विभागाकडे प्राप्त झाल्या असून, त्यातील ३५० नौकांना ही यंत्रणा बसविण्यात आली आहे.
- लवकरच ही सिग्नल यंत्रणा उर्वरित नौकांना बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
अधिक वाचा: मत्स्यपालन करताय? कमी कालावधीत अधिक वजन देणारा हा मासा ठरतोय फायदेशीर