रत्नागिरी: गेल्या आठ महिन्यांच्या बंदीनंतर पर्ससीन मासेमारीला सोमवार, दि. १ सप्टेंबरपासून सुरुवात झाली.
दि. १ ऑगस्टपासून मासेमारीवरील बंदी उठली असली, तरी पर्ससीन मासेमारीला दि. १ सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागते. ती प्रतीक्षा आता संपली असून, सोमवारपासून मोठ्या नौका समुद्रावर स्वार झाल्या आहेत.
मागील महिनाभरात समुद्राला आलेले उधाण, त्यात समुद्रामध्ये येणाऱ्या अजस्त्र लाटा आणि त्याच्या जोडीला पाऊस आणि वारा अशा प्रतिकूल स्थितीचा सामना नव्या हंगामाच्या सुरुवातीला मच्छिमारांना करावा लागला.
या स्थितीमध्ये सोमवारपासून पर्ससीन नेटद्वारे सुरू होणाऱ्या मासेमारीच्या नव्या हंगामाला सामोरे जावे लागणार आहे.
मच्छिमाराला समुद्रातील प्रतिकूल ठरणारे संभाव्य हवामान अन् वातावरण, त्याचबरोबर समुद्राच्या पाण्यामध्ये असणारा करंट यांचा अंदाज घेत मच्छिमार बांधव हातामध्ये जाळी घेत समुद्रामध्ये झेपावण्यासाठी सज्ज झाला आहे.
रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात रोज मत्स्य व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होते. पर्ससीन नेट, फिशिंग ट्रॉलर, यांत्रिक होड्या, बिगरयांत्रिक होड्या मासेमारी करतात.
यावर्षीच्या नव्या हंगामासाठी मच्छिमार सज्ज झाले आहेत. खलाशीही बंदरामध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. त्यामुळे बंदर परिसरातील बाजारपेठ पुन्हा एकदा गजबजू लागली आहे.
मासेमारीसाठी सद्यस्थितीत प्रतिकूल वातावरण आहे. समुद्रातील पाण्यालाही चांगलाच करंट आहे. पाऊस आणि वारा याचीही मच्छिमारांना चिंता आहे. या साऱ्या प्रतिकूल स्थितीचा अंदाज घेऊन पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करण्यासाठी मच्छिमार सज्ज झाले आहेत.
अधिक वाचा: सप्टेंबर महिन्याच्या 'या' आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा दमदार पावसाची शक्यता