पावसाळा म्हटला की आजारांचा हंगाम सुरु होतो. या काळात वातावरणात जिवाणू आणि विषाणूंची वाढ झपाट्याने होते. परिणामी, जनावरे विविध संसर्गजन्य आजारांना बळी पडतात.
त्यामुळे पावसाळ्यात जनावरांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे असा सल्ला पशुवैद्यकीय तज्ञ देतात. ज्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांची आर्थिक हानी टळते तसेच जनावरे सुद्धा निरोगी राहतात.
पावसाळ्यात जनावरांना घटसर्प, फऱ्या, पायलाग यांसारखे संसर्गजन्य आजार होतात. अनेकदा जनावरास फरेनहाइट ताप येतो. संसर्ग झालेल्या जनावरांपैकी ९० टक्के जनावरे मृत्युमुखी देखील पडतात. त्यामुळे वेळोवेळी काळजी घेणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात बळावणारे आजार व उपाययोजना
पोट फुगणे : पावसाळ्यात हिरवा आणि कोवळा चारा मोठ्या प्रमाणात खाल्ल्यामुळे जनावरांचे पोट फुगते. ही समस्या टाळण्यासाठी हिरव्या चाऱ्यासोबत दररोज २ ते ३ किलो सुका चारा देणे गरजेचे आहे. यामुळे जनावरांची पचनक्रिया सुरळीत राहते आणि पोटफुगीपासून बचाव होतो.
बुळकांडी : बुळकांडी हा एक विषाणूजन्य आजार असून 'पॅरामिक्सो' या विषाणूमुळे होतो. पावसाळ्यात या आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो. प्रतिबंधासाठी या आजाराविरोधात लसीकरण करणे, गोठ्यांची नियमित स्वच्छता राखणे आणि संसर्ग झालेल्या जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे ठेवणे आवश्यक आहे.
गढूळ पाण्यातून आजार : पावसाळ्यात पाण्याचे स्रोत गढूळ होण्याची शक्यता अधिक असते. अशा पाण्यात रोगजंतूंची वाढ होते आणि त्यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात येते. यासाठी पाण्याच्या टाक्यांना चुना लावावा आणि पाणी शुद्ध करण्यासाठी त्यात १ टक्का पोटॅशियम परमॅग्नेट मिसळावे.
पावसाळ्यात जनावरांचे मलमूत्र वेळीच स्वच्छ करून गोठा कोरडा करावा. गोठ्यात हवा खेळती राहिल्यास जनावरांच्या दृष्टीने चांगले वातावरण राहते. - डॉ. उमेश पाटील, पशुसंवर्धन विभाग, नंदुरबार.