पशुपालन हा भारतीय शेतीचा कणा मानला जातो. दुध, मांस, शेणखत, रोजगार आणि आर्थिक स्थैर्य यासाठी पशुपालनाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, पशुपालन यशस्वी होण्यासाठी जनावरांचे आरोग्य चांगले असणे ही सर्वात महत्त्वाची अट आहे.
जनावरांचे आरोग्य मुख्यत्वे त्यांना मिळणाऱ्या आहारावर अवलंबून असते. म्हणूनच “संतुलित आहार म्हणजे निरोगी जनावरे” हे विधान पशुपालनात अत्यंत योग्य ठरते.
दरवर्षी १० फेब्रुवारी रोजी जागतिक कडधान्य दिन साजरा केला जातो. कडधान्ये ही केवळ मानवी आहारासाठीच नव्हे, तर पशुखाद्य पोषणासाठीही अत्यंत महत्त्वाची आहेत.
कडधान्यांमधून मिळणारी प्रथिने, ऊर्जा, खनिजे आणि जीवनसत्त्वे जनावरांच्या वाढीस, उत्पादनास आणि रोगप्रतिकारशक्तीस मोठ्या प्रमाणात मदत करतात. या दिनानिमित्त पशुखाद्यातील पोषणाचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे.
संतुलित आहार म्हणजे काय?
जनावरांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणारा, योग्य प्रमाणात ऊर्जा, प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे, पाणी आणि तंतू (Fiber) असलेला आहार म्हणजे संतुलित आहार होय. फक्त पोट भरणे म्हणजे आहार नव्हे, तर शरीराच्या गरजेनुसार पोषण मिळणे आवश्यक आहे.
अनेक पशुपालक आजही “जनावर पोटभर खात आहे म्हणजे पुरेसे आहे” असा समज करतात. पण प्रत्यक्षात जर आहार संतुलित नसेल तर जनावर अशक्त होते, दूध उत्पादन घटते, प्रजननात अडचणी येतात आणि आजारांचा प्रादुर्भाव वाढतो.
संतुलित आहाराचे जनावरांच्या आरोग्यावर होणारे परिणाम
(संतुलित आहार दिल्यास जनावरांमध्ये खालील सकारात्मक परिणाम दिसून येतात:)
• शरीराची वाढ योग्य प्रकारे होते.
• दूध उत्पादन व दूधातील फॅट वाढते.
• रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
• प्रजननक्षमता सुधारते.
• वासरांची वाढ जलद व निरोगी होते.
याउलट असंतुलित आहारामुळे कुपोषण, अॅसिडोसिस, केटोसिस, दूधताप, वंध्यत्व, पायाचे आजार, केस गळणे यासारख्या समस्या उद्भवतात.
पशुखाद्यातील पोषक घटक
(जनावरांच्या आहारात विविध पोषक घटकांचा समावेश असणे आवश्यक आहे.)
• ऊर्जा : ऊर्जा जनावरांच्या हालचाली, शरीराचे तापमान आणि दूध उत्पादनासाठी आवश्यक असते. ऊर्जा प्रामुख्याने धान्ये, कडधान्यांचे दाणे, मका, ज्वारी, बाजरी यांमधून मिळते.
• प्रथिने : प्रथिने शरीराच्या वाढीस, दूध निर्मितीस व ऊतींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असतात. कडधान्ये ही प्रथिनांचा उत्तम स्रोत आहेत.
• खनिजे व जीवनसत्त्वे : कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, झिंक तसेच जीवनसत्त्व A, D, E ही हाडे, प्रजनन व रोगप्रतिकारशक्तीसाठी आवश्यक आहेत.
• तंतू (Fiber) : रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये पचनक्रिया सुरळीत चालण्यासाठी तंतू महत्त्वाचे असतात.
कडधान्यांचे पशुखाद्यातील महत्त्व
कडधान्ये ही पशुखाद्यातील अत्यंत मौल्यवान घटक आहेत. हरभरा, तूर, उडीद, मूग, मसूर, चवळी, सोयाबीन ही कडधान्ये जनावरांसाठी प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहेत.
कडधान्यांचा वापर पशुखाद्यात केल्यास
• आहारातील प्रथिनांची कमतरता भरून निघते.
• दूध उत्पादन वाढते.
• जनावरांची प्रतिकारशक्ती सुधारते.
• वासरांची वाढ चांगली होते.
विशेषतः सोयाबीन पेंड, हरभरा कुट, तूर कुट हे पशुखाद्यात मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.
प्रमुख कडधान्ये व त्यांचे पोषणमूल्य
जागतिक कडधान्य दिनाचे पशुपालनातील महत्त्व
जागतिक कडधान्य दिन हा दिवस पशुपालकांमध्ये कडधान्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी उपयोगी ठरतो. या दिवशी पशुपालकांनी खालील बाबींवर लक्ष देणे आवश्यक आहे.
• पशुखाद्यात प्रथिनांचा समावेश वाढवणे.
• स्थानिक पातळीवर उपलब्ध कडधान्यांचा वापर करणे.
• संतुलित आहाराचे नियोजन करणे.
जागतिक कडधान्य दिन हा दिवस केवळ साजरा न करता जागरूकता वाढविण्याचा दिवस म्हणून वापरावा.
संतुलित आहार व दूध उत्पादन यांचा संबंध
दुधाळ जनावरांना योग्य प्रमाणात ऊर्जा व प्रथिने मिळाल्यास दूध उत्पादनात लक्षणीय वाढ होते. अनेक अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की, संतुलित आहार दिलेल्या जनावरांचे दूध उत्पादन १५-२५% टक्क्यांनी वाढते.
दूध उत्पादन वाढीसाठी
• हिरवा व कोरडा चारा योग्य प्रमाणात देणे.
• कडधान्यांपासून तयार केलेला एकवट खाद्य देणे.
• खनिज मिश्रण व मीठ यांचा समावेश आवश्यक आहे.
संतुलित आहार व असंतुलित आहाराचे परिणाम
लहान वासरांसाठी संतुलित आहाराचे महत्त्व
वासरे ही पशुपालनाची भविष्यातील संपत्ती आहेत. जन्मापासूनच जर त्यांना योग्य पोषण मिळाले नाही तर त्यांची वाढ खुंटते. त्याउलट कडधान्यांपासून तयार केलेला पूरक आहार वासरांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.
वासरांसाठी महत्वाचे
• कोलोस्ट्रम (पहिले दूध).
• हळूहळू कडधान्य मिश्रित पूरक खाद्य.
• स्वच्छ पाणी.
यांचा समावेश आवश्यक आहे.
संतुलित आहार म्हणजे निरोगी जनावरे
“संतुलित आहार म्हणजे निरोगी जनावरे” हे वाक्य केवळ घोषवाक्य नसून पशुपालनातील एक मूलभूत सत्य आहे. जागतिक कडधान्य दिनानिमित्त पशुखाद्यातील कडधान्यांचे महत्त्व ओळखून त्यांचा योग्य वापर केल्यास पशुपालन अधिक फायदेशीर, टिकाऊ व शाश्वत होऊ शकते. संतुलित आहारामुळे जनावरे निरोगी राहतात, दूध उत्पादन वाढते आणि पशुपालकांचे आर्थिक उत्पन्न निश्चितच सुधारते.
डॉ. एस. एम. खुपसे
विषय विशेषज्ञ (पशुधन व्यवस्थापन),
एमजीएम, कृषि विज्ञान केंद्र गांधेली, छ.संभाजीनगर.
