अनेक वेळा आपली गाय व म्हैस व्याल्यानंतर दोन ते आठ तासात वार पडायला हवी. अनेक वेळा ती पडत नाही. पशुपालक अनेक उपाययोजना करतातना आपल्याला दिसतात.
वार म्हणजे काय?
◼️ वार ही वासरू, रेडकु गर्भाशयात असताना त्यांच्याभोवती एक सुरक्षित आवरण म्हणून काम करत असते.
◼️ पडलेल्या वारेवर अनेक फुलाच्या आकाराची रचना दिसते.
◼️ गर्भाशयाच्या आतील बाजूस देखील अशीच फुले असतात.
◼️ ती एकमेकांना चिकटून त्याद्वारे वासराला प्राणवायू व रक्तपुरवठा करत असतात.
◼️ साधारण अशा फुलांची संख्या ७० ते ११० पर्यंत असते.
◼️ अशी ही वार वासरू जन्माला आल्यानंतर गर्भाशयाच्या आकुंचन प्रसारणामुळे नैसर्गिक रित्या एकमेकांपासून अलग होऊन शेवटी वार बाहेर पडते.
वार कधी पडते?
◼️ गाई व म्हशीची तब्येत चांगली व निरोगी असेल तसेच गाभण काळात समतोल आहार दिला गेला असेल तर साधारण दोन ते आठ तासात ही वार पडून जाते.
◼️ विताना जर काही त्रास झाला नाही, चीक व्यवस्थित दिला असेल आणि भरडा वैरण व्यवस्थित खाणे चालू असेल तर आठ तासांपेक्षा जास्त वेळ वार पडण्यास लागला तरी काही अडचण नाही.
वार न पडण्याची कारणे
◼️ गाय व म्हैस यायला झाल्यानंतर शेवटच्या चार बरगड्या जर दिसत असतील तर ती अशक्त समजली जाते. अशा अशक्त गाई व म्हशीत वार अडू शकते.
◼️ वार बाहेर टाकण्यासाठी ऊर्जेबरोबर कॅल्शियम व फॉस्फरस ची गरज असते. सोबत सेलेनियम, तांबे, आयोडीन या खनिज द्रव्याचे देखील आवश्यकता असते. त्याच्या कमतरतेमुळे देखील वार पडत नाही.
◼️ अनेक वेळा संसर्गजन्य गर्भाशयाचे आजार, गर्भाशय दाह असेल तरी देखील वार अडते. गाय व म्हैस पूर्ण दिवस न घेता व्याली असेल, गर्भपात झाला असेल तरी देखील वार पडत नाही.
◼️ अनेक वेळा गाय व म्हैस विताना खूप त्रास झाला, गाय म्हैस दमली असेल तर गर्भाशयाच्या आकुंचन प्रसारावर त्याचा परिणाम होऊन वार अडू शकते.
◼️ अनेक वेळा जास्तीच्या गाभण काळ जर घेतला असेल म्हणजे गाईच्या बाबतीत २८० दिवसापेक्षा जास्त व म्हशीच्या बाबतीत ३१० दिवसापेक्षा जास्त तर वार अडू शकते. काही वेळा ही बाब अनुवंशिक असते पण त्याचे प्रमाण खूप कमी आहे.
वार पडली नाही तर कसे कराल उपाय?
◼️ दहा तासापर्यंत जर वार पडली नाही तर त्याला कधीही चप्पल, केरसुणी बांधू नये.
◼️ तज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने तात्काळ उपायोजना करून घ्यावी.
◼️ शक्यतो वार हाताने काढायची नाही असे पशुवैद्यक शास्त्रात सांगितले जाते. तथापि ही बाब आपण पशुवैद्यकाशी चर्चा करून ठरवावी.
◼️ पडलेली वार खोल खड्ड्यात पुरून टाकावी.
◼️ वार पडण्यासाठी गाय म्हैस व्याल्यानंतर दहा लिटर कोमट पाण्यात अर्धा किलो गूळ घालून पाजावे.
◼️ वेळीच समतोल आहार, नियमित खनिज मिश्रणे दिल्याने वार पडण्यास मदत होते.
◼️ विण्यापूर्वी गोठा नियमित स्वच्छ ठेवावा.
◼️ दररोज निरण, शेपटी खालील कासेचा भाग स्वच्छ ठेवावा.
◼️ व्याल्यानंतर वार पडायची वाट न पाहता तात्काळ कास स्वच्छ धुऊन कोरडी करावी व धार काढावी. त्यामुळे वार पडण्यास मदत होते.
◼️ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने बाजारातील उपलब्ध आयुर्वेदिक औषधे दिल्यास त्याचा देखील चांगला फायदा होतो.
डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: गाईचे वर्षाला तर म्हशीचे सव्वा वर्षाला एक वेत घेण्यासाठी ही तपासणी कराच