Join us

जनावरांना मान्सूनपूर्व लसीकरण का व कसे करावे? काय आहेत फायदे? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 11:43 IST

Monsoon Lasikaran आपल्या सर्व जनावरांना जंतनाशके देऊन झाली असतील. आता मान्सूनपूर्व लसीकरण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. नियमितपणे पावसाळ्यापूर्वी आपण लसीकरण करून घेत असतोच.

आपल्या सर्व जनावरांना जंतनाशके देऊन झाली असतील. आता मान्सूनपूर्व लसीकरण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. नियमितपणे पावसाळ्यापूर्वी आपण लसीकरण करून घेत असतोच.

त्यामध्ये प्रामुख्याने घटसर्प, फऱ्या, लंपी त्याचबरोबर शेळ्या मेंढ्यांमध्ये आंत्रविषार या लसी आपल्या जनावरांना टोचून घेतो. आपले बहुमोल पशुधन या रोगापासून दूर ठेवतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आपले खूप मोठे नुकसान आपल्याला सोसावे लागते.

यासोबत जागतिक स्तरावर देखील अशा साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या देशातील अनेक प्राणीजन्य उत्पादने विकसित देश आयात करायला धजावत नाहीत. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अनेक वेळा उपचार करण्यासाठी देखील वेळ मिळत नाही.

राज्य व केंद्र सरकारला देशातून अनेक रोगांचे समूळ उच्चाटन करावयाचे आहे. राज्य व केंद्र शासनाच्या निरनिराळ्या योजनांमधून मोठ्या प्रमाणात लसीचां पुरवठा होत असतो. त्यासाठी शीत साखळीची काळजी घेऊन सदर लसी आपल्या दवाखान्यात पोहोचवतात.

दवाखान्यातील अधिकारी कर्मचारी सदर लस बर्फातून आपल्या घरापर्यंत, गोठ्यात येऊन टोचत असतात. त्यांना योग्य ते सहकार्य करणे हे सर्व पशुपालकांचे कर्तव्य आहे.

त्याचबरोबर योग्य आणि विहित प्रोटोकॉल वापरून लसीकरण करणे ही देखील संबंधितांची जबाबदारी आहे याबाबत दुमत असण्याचे कारण नाही.

लसीकरणापूर्वी जंतनाशके औषधे पाजल्याने वापर केलेल्या लसीचे चांगले परिणाम दिसून येतात. चांगली प्रतिकारशक्ती निर्माण होऊन आपल्या पशुधनाचे संरक्षण होते.

जनावरांच्यात लसीकरण प्रक्रियेत घ्यावयाची काळजी◼️ लसीकरण करून घेतल्यानंतर विशेष करून बैलांना एक आठवडा हलके काम द्यावे.◼️ सर्व जनावरांना चांगला सकस आहार द्यावा.◼️ लसीकरण केल्यानंतर जनावरे अतिउष्ण व अति थंड वातावरणामध्ये बांधू नये.◼️ दूर अंतरावर त्यांची वाहतूक देखील टाळावी.◼️ अनेक वेळा लसीकरणानंतर ताप येतो तो तात्कालीक व सौम्य असतो. त्याची काळजी करू नये.◼️ अनेक वेळा आपण जनावरांना गाठी येतात म्हणून लसीकरण टाळतो.◼️ तसे न करता लसीकरणानंतर हलक्या हाताने चोळल्यास गाठी येण्याचे प्रमाण कमी होते.◼️ पशुपालकांना लसीचा गाठी कुठे ना कुठे येतात हे माहीत असते त्यामुळे त्याची खरेदी विक्री करताना त्याला बट्टा समजत नाहीत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.◼️ क्वचित एखाद्या जनावरात लसीकरणानंतर गर्भपात होऊ शकतो. त्याचे प्रमाण खूप नगण्य आहे.◼️ त्यामुळे गाभण जनावरांना लसीकरण करून घेताना काळजी घ्यावी पण टाळू नये.◼️ लसीकरणानंतर चार-पाच दिवस दूध देखील कमी होते. पण पुन्हा पूर्ववत होते हे लक्षात घ्या.◼️ लसीकरण केल्यानंतर रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्यास साधारण २१ दिवस लागतात. त्यामुळे लसीकरणानंतर देखील काही वेळा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.◼️ सहा ते आठ आठवडे वयाच्या वासरांना देखील लसीकरण करून घ्यावे.◼️ टोचलेल्या लसीची संपूर्ण नोंद आपल्या नोंदवहीत करून ठेवावी.

एकंदरीत पावसाळ्यापूर्वी लसीकरणासाठी ज्यावेळी पशुवैद्यकीय दवाखान्यातील मंडळी आपल्याकडे येतील तेव्हा त्यांना संपूर्ण सहकार्य करून लसीकरण करून घ्यावे. आपले पशुधन साथीच्या रोगापासून दूर ठेवावे.

- डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगलीअधिक वाचा: जनावरांच्या पोटात जंत झाले आहेत हे कसे ओळखाल? काय कराल उपाय? वाचा सविस्तर

टॅग्स :दुग्धव्यवसायगायशेतकरीमोसमी पाऊसपाऊसआरोग्यदूधराज्य सरकारकेंद्र सरकार