दूध देण्याची प्रक्रिया गाय विल्यानंतर सुरू होते. गाईचे नियमितपणे प्रत्येक दुभत्यात ३०० दिवस दूध देऊन वर्षाकाठी एक वित देणे फायद्याचे आहे. त्याकरता तिला वेळीच गाभण करण्याची काळजी घ्या.
गाय माजावर केव्हा येते?
१) जर्सी संकर कालवडी २०० ते २२५ किलो तर होलस्टीन संकर कालवडी २५० ते २७५ किलो वजनाच्या झाल्यानंतर माजावर आल्या पाहीजेत.
२) व्याल्यानंतर काही गाई बरेच दिवस माज दाखवत नाहीत. व्यवस्थापन उत्तम असल्यास बऱ्याच गाई व्याल्यानंतर ४५ ते ६० दिवसात माजावर येणे आवश्यक आहे.
३) माजावर असलेल्या गाईच्या योनीतून पारदर्शक स्वच्छ निरोगी सोट वाहतो, तिथे निरण लालसर फुगीर होते, शेपुट उचलून ती वारंवार लघवी करते.
४) गाई हंबरते, दुसऱ्या गाई वासरावर उडी मारते, बेचैन होते, पाठ ताणते, दूध देतेवेळी ती खळखळ करते, खाण्यावरुन तिचे लक्ष उडते.
५) मुका माज रात्रीच्या वेळी असतो. त्याची गाईतील लक्षणे तीव्र नसतात.
६) माजावर अपेक्षित गाईच्या माजाची योग्य स्थिती ओळखण्यासाठी गोठ्यात रात्रीच्यावेळी फेरफटका मारुन तिच्या पाठीमागील भागाचे बारीक निरीक्षण करावे.
गाभण रहाण्यासाठी गाईला केव्हा भरून घ्यावे?
१) बारीक निरीक्षणानंतर माजाची योग्य स्थिती माहित करुन घेऊन सकाळी माजावर आढळलेल्या गाईला संध्याकाळी, पहिल्यांदा माजावर आलेल्या गाईस १२ तासांनी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पशुवैद्यकाकडून दुधाळ जातीवंत किंवा सिद्ध वळूचे वीर्य वापरून रेतन करुन घ्यावे.
२) गाय माजावर आहे परंतु तिच्या योनीतून येणारा स्त्राव अनैसर्गिक किंवा गर्भाशयाचा दाह झाल्याचे लक्षण दाखवित असल्यास कृत्रिम रेतन न करता तज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावेत.
३) गाय फळविण्यासाठी गावठी किंवा अनोळखी वळू न वापरता जातिवंत विर्यासाठी पशुवैद्यक अधिकाऱ्याकडे मागणी करा.
अधिक वाचा: शेळ्या व मेंढ्या खरेदी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु; जाणून घ्या सविस्तर