लाल लघवीचा आजार गायी-म्हैशी त्यात विशेष करून म्हशीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. अनेकवेळा पशुपालकाचे नसल्यामुळे सुरुवातीला होणारी लाल लघवी लक्ष लक्षात येत नाही.
जनावर ही वैरण खात असते. जसे जसे दिवस जातात तसे जनावर वैरण कमी खाते. दूध उत्पादन घटते. शेण टाकताना जनावर वाकते.
अशावेळी मग पशुपालकाचे लक्ष त्याच्याकडे जाते. नेमकी लाल लघवी होत असल्याचे निदर्शनाला येते. मग उपचाराला सुरुवात होते.
साधारणपणे हा आजार गायी-म्हशीच्या गाभण काळातील शेवटच्या दोन-तीन महिन्यात किंवा व्याला नंतरच्या दोन-तीन महिन्यात आढळून येतो.
त्याचे एकमेव कारण हे स्फुरद (फॉस्फरस) या खनिज द्रव्याच्या कमतरतेमुळे हा आजार उद्भवतो.
गर्भाच्या वाढीसाठी व दूध उत्पादनासाठी लागणारे स्फुरद आणि आहारातून उपलब्ध होणारे स्फुरद यामध्ये असमतोल निर्माण झाला की रक्तातील लाल पेशींना आवश्यक ऊर्जा मिळत नाही.
त्या फुटतात आणि त्यातील लाल रंगाचे हिमोग्लोबिन लघवीत उतरते. ते लघवी वाटे बाहेर पडते. त्यामुळे लघवीला लाल रंग येतो.
मुळातच आपल्या जिल्ह्यातील जमिनीत स्फुरदचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे अशा जमिनीत घेतलेल्या चारा पिकात, वैरणीत स्फुरद कमी असते.
या आजारामध्ये गायी-म्हशीचे तापमान हे नॉर्मल असते हे विशेष. अनेकवेळा जनावराचे तापमान वाढून जनावरे विशेषता गाई लाल लघवी करतात. अशावेळी तो बबेसिओसिस नावाचा गोचीड ताप असू शकतो.
लहान वासरे, रेडकू ज्या वेळेला ज्यादा पाणी पितात त्यावेळीही लहान वासरे, रेडक लाल लघवी करतात.
या गोष्टी पशुपालकांनी लक्षात ठेवाव्यात. उशिरा उपचार सुरू झाल्यामुळे हा रोग आटोक्यात आणण्यासाठी खूप वेळ आणि पैसा खर्च होतो.
- डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहायक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: सौरपंप मिळण्यास होतोय उशीर! पुरवठादाराची निवड करताना शेतकऱ्यांचा उडतोय गोंधळ
