बाळासाहेब काकडे
पाणीटंचाईच्या झळा सुरू होताच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत दुभत्या संकरित गायींचे भाव कवडीमोल झाले आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे दर शनिवारी भरणाऱ्या जनावरांच्या आठवडे बाजारात महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, गुजरातमधून जनावरे विक्रीसाठी येतात. या बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. यातून श्रीगोंदा बाजार समितीचे आर्थिक चक्र फिरत आहे. तसेच काष्टी गावच्या विकासाला दिशा मिळाली आहे.
शनिवारी (दि.५) भरलेल्या आठवडे बाजारात दोन हजार संकरित गायी, आठशे म्हशी, दीड हजार खिलारी, गावरान बैल, गायी विक्रीसाठी आले होते. दुधाचे भाव पडले आहेत. अशा परिस्थितीत चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पाणी कसे उपलब्ध करायचे, असा प्रश्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुभत्या गायी बाजारात आणल्या आहेत. गायी विक्रीचे प्रमाण दुप्पट झाले आहे. आहे. परिणामी भावावर अनिष्ट परिणाम झाला आहे.
विक्री किंमत पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू
• २० लिटर दूध देणारी गाय २५ ते ३० हजारांस विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गोपालनावर झालेला खर्च आणि विक्री किंमत पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू दिसत आहेत.
• म्हशीचे भाव मात्र स्थिर आहेत. दुभत्या म्हशींना शहरी भागातील ग्राहक आहेत. बैलजोडी व खिलार गायींना फारशी मागणी नाही. भावात झालेली घसरण कायम आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
जनावरे चांगल्या दर्जाची येत आहेत. मात्र, बाजारात ग्राहक नाहीत. त्यासाठी विक्रीची मजाच संपली आहे. जुलै महिन्यापर्यंत अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. - योगेश दांगट, व्यापारी, काष्टी, ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर.
आठवडे बाजारात जनावरांची संख्या स्थिर आहे. मात्र, दुभत्या गायींना भाव नाही हे खरे. तर काही शेतकरी, व्यापारी वासरे बाजारात सोडून जातात. हे चुकीचे आहे. वासरे बाजारात सोडून देऊ नयेत. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अशी वासरे मारली जात आहेत. त्यासाठी आम्ही फलक लावले आहेत. - राजेंद्र लगड, सचिव, बाजार समिती, श्रीगोंदा जि. अहिल्यानगर.
चारा संपला, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गाय विकण्यास आणली. २० लिटर देणारी गाय अवघ्या २४ हजारांस विकली. सोन्यासारखे जनावर त्याला मातीचा भाव, अशी अवस्था झाली आहे. यामुळे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. - राजेंद्र बोरुडे, घोगरगाव, ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर.
हेही वाचा : ऑनलाईन माहिती घेत रणजित करताहेत शेती; १० गुंठे क्षेत्रात झाली अडीच लाखांची पपई