साहिल शहा
कोरेगाव : कोरेगाव तालुका म्हटलं की गावजत्रा अन् बैलगाडा शर्यत, कुस्ती, देवाचे बगाड आलाच. बैलगाडा क्षेत्रात राज्यात नावाजलेला बैल हिंदकेसरी 'महाद्या.
बैलगाडा म्हटलं की 'महाद्या' बैलाची बारी आठवते. या "बैलाची घाटातली बारी बैलगाडी शौकिनांना पाहावयास मिळत नाही. कारण बारा वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच या बैलाचा मृत्यू झाला.
दरवर्षी रामोशीवाडी येथील ग्रामस्थ महाद्याचा स्मृतिदिन साजरा करतात. बारावा स्मृतिदिन रविवारी दुपारी बारा वाजता साजरा करण्यात आला. यासाठी राज्यभरातून बैलगाडी शौकीन उपस्थित राहिले होते.
चिमणगाव विकास सोसायटीचे चेअरमन शंकरराव मदने यांचा हा बैल होता. हा महाद्या बैल कसा पळतो व फायनलमध्ये इतर गाडा मालकांच्या आतून एक-दोन सेकंदाच्या फरकाने कशी आतून बारी आणतो.
हे पाहण्यासाठी बैलगाडा शौकीन हजारोंच्या संख्येने थांबायचे. मात्र, अशा या महाद्या बैलाचा बारा वर्षांपूर्वी मृत्यू झाला. 'महाद्या'ची ओळख ही फक्त सातारा जिल्ह्यापुरतीच मर्यादित नव्हती, तर राज्यभरात तो प्रसिद्ध होता.
त्याचा चालण्याचा, पळण्याचा रुबाब काही औरच होता. 'महाद्या'च्या जाण्याने मालकासह कोरेगाव तालुक्यातच नव्हे, तर राज्यभरातील जुन्या जाणत्या बैलगाडी शौकीनांना दुःख झाले.
सातारा हा सर्वांत जास्त बैलगाडा शर्यत असणारा जिल्हा म्हणून देशभरात ओळखला जातो. प्रत्येक महत्त्वाच्या गावात असणाऱ्या यात्रा, जत्रांमध्ये बैलगाडा शर्यती घेतल्या जातात. त्यात अनेक बैलगाडा मालक आवडत्या बैलाला या शर्यतीत उतरवतात.
मुलाप्रमाणे शेतकरी आपल्या बैलाचा सांभाळ करतो. सर्व गोष्टी त्याच्या मुलाप्रमाणे करतो. मात्र, अनेक शर्यतीमध्ये आपल्या मालकाची मान गर्वाने उंचवणाऱ्या महाद्याची बारा वर्षांपूर्वीची एक्झिट सर्वांच्या मनाला चटका लावून गेली आहे.
शर्यतीसाठी बैल तयार करायचा असल्यास त्याच्या देखणेपणावर जास्त काम करावे लागते. त्याला वेळेवर खुराक देणे, त्याला वेळेत धुऊन काढणे, त्याची शरीरयष्टी धिप्पाड आणि देखणी करण्यासाठी दररोज सराव आवश्यक असतो.
शर्यतीमध्ये देखण्या बैलाला मागणी असते, तर किताब पटकावलेल्या बैलांचा मान मोठा असतो. महाद्या हा त्यापैकी एक होता. सर्वोच्च न्यायालयाने बंदी घालण्यापूर्वी बैलगाडी शर्यत हा फार चर्चेत नसलेला विषय होता.
त्यादरम्यान शंकरराव मदने यांनी सासरवाडी डिस्कळजवळील चिंचणी गावातून खोंड आणून तयार केला होता. महाद्याने उभ्या आयुष्यात एक हजारहून अधिक शर्यतीत भाग घेतला. त्यामध्ये पाचशे पेक्षा अधिक ठिकाणी प्रथम क्रमांक पटकावला.
महाद्या हा एकेकाळी बैलगाडी शर्यतीतली शान होता. या बैलाची धावण्याची असलेली शैली, त्याने अंतीम क्षणी कसे मैदान जिंकले या आठवणींना उजाळा मिळत होता.
कीर्तन अन, समाधीवर फुले टाकली !
◼️ बारा वर्षांपूर्वी त्याचे निधन झाले. कुटुंबातील एक सदस्य या नात्याने मदने कुटुंबीयांनी सर्व विधी आणि सोपस्कार पार पाडले. त्यानंतर त्याची समाधी अंगणात बांधली.
◼️ दरवर्षी त्याचा स्मृतिदिन साजरा केला जातो. मान्यवर कीर्तनकारांचे कीर्तन होते आणि दुपारी बारा वाजता फुले टाकण्याचा कार्यक्रम होतो. त्यानंतर उपस्थित लोकांना जेवण दिले जाते.
उसळला जनसागर
गेली बारा वर्षे हा कार्यक्रम अखंडपणे सुरू आहे. या कार्यक्रमास राज्यभरातील नामांकित बैल मालक आणि बैलगाडी शौकीन उपस्थित असतात. यावर्षीदेखील मोठा जनसागर उसळला होता. यावर्षी चिंचणेर संमत निंब येथील हरिभक्त परायण उमेश महाराज किर्दत यांचे कीर्तन झाले. त्यानंतर असंख्य बैलगाडी शौकिनांनी फुले टाकत महाद्याला श्रद्धांजली वाहिली.
अधिक वाचा: आता घरबसल्या मिळणार जुने दस्त; नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने सुरु केली 'ही' नवीन सुविधा