वारणानगर : वारणा सहकारी दूध संघाच्या वार्षिक सभेत अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे संघाकडून अनुदान योजनेतून म्हैस विक्री सुरू आहे.
त्याला दूध उत्पादकांचा प्रतिसाद मिळत असून, म्हैस खरेदी योजनेसाठी डॉ. आर. ए. पाटील वारणा संघ संलग्न प्राथमिक दूध संस्था सेवकांच्या पतसंस्थेकडून म्हैस खरेदीसाठी जादाचे १० हजार रुपये अनुदान देणार आहे.
वारणा दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ७० हजार रुपये अनुदानाबरोबर आर. ए. पाटील संस्थेकडून जादाचे १० हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.
म्हैस खरेदी करणारा जर वारणा दूध संघाचा कर्मचारी असेल तर अमृत सेवक संस्थेकडून त्याला जादाचे १० हजार अनुदान देण्यात येईल तसेच आर. ए. पाटील संस्थेमार्फत दीड लाख रुपयांचे कर्जही देण्यात येणार असल्याचे संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी सांगितले.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना जातिवंत जनावरे रास्त किमतीत व कमी वेळेत मिळावीत, याकरिता संघाने जातिवंत मुन्हा, मेहसाणा या जातीच्या म्हशी संघाच्या गोठ्यावर विक्रीस उपलब्ध केल्या आहेत, असे वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे सर्व संचालक, पशुवैद्यकीय विभागप्रमुख डॉ. जे. बी. पाटील, संकलन व्यवस्थापक डॉ. अशोक पाटील, अमृत सेवक संस्थेचे सचिव उदय निकम, आर. ए. पाटील संस्था सचिव राजगोंडा पाटील आदी उपस्थित होते.
अधिक वाचा: भीमाशंकर कारखान्याकडून अंतिम ऊस दर जाहीर; पुढील पंधरवड्याचे ऊस बिल किती रुपयाने मिळणार?
