सध्या राज्यभर हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत आहे. त्यामुळे मानवाप्रमाणेच गुरांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. यामुळे जनावरांना विविध आजार बळावण्याची शक्यता आहे. अशावेळी पशुपालकांनी जनावरांची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाने केले आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व दुग्धव्यवसाय केला जातो. अशा स्थितीत हिवाळ्यात जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. वाढत्या थंडीमध्ये लाळ्या खुरकूत, न्यूमोनिया, अतिसार अशा आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे या आजारांपासून जनावरांचे रक्षण करणे आवश्यक आहे.
दरम्यान काही दिवसांपासून सर्वत्र थंडीत वाढ झाली असून अशावेळी जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जनावरांना मोकळ्या जागेत न बांधता गोठ्यात बांधणे आवश्यक आहे. याबरोबर पुढील प्रमाणे काही महत्वाचे उपाय करणे देखील गरजेचे आहे.
पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घ्यावा!
• सर्वप्रथम थंडीपासून जनावरांचा बचाव करणे महत्त्वाचे आहे. याकरिता विविध उपाययोजनांचा अवलंब करणे हिताचे ठरते.
• केवळ संरक्षणच नव्हे, तर जनावरांच्या संतुलित आहारात हिरवा चारा, खनिज मिश्रण यांसारख्या घटकांचा समावेश असावा.
• न्यूमोनिया टाळण्यासाठी जनावरांचे थंड हवेमुळे होणाऱ्या परिणामांपासून संरक्षण करावे.
• जनावरे चारा खात नसतील, तर त्वरित पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
संतुलित आहाराचे महत्त्व
जनावरांच्या आहारात हिरवा चारा तसेच उष्णता वाढविणाऱ्या ढेप, सरकी यांसह अन्य खाद्यांचा समावेश करावा. त्यामुळे गुरांचे शरीर तंदुरुस्त राहते.
थंडीमध्ये जनावरांच्या आहारावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. थंडीच्या दिवसांत जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागते. - डॉ. अमितकुमार दुबे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बुलढाणा.
हेही वाचा : आता सर्पदंशावर होणार अचूक उपचार; स्नेक वेनम किटमुळे कळणार सर्पदंश विषारी की बिनविषारी
