राहाता : गेल्या वर्षातील एकूण सहा महिन्यांत प्रति लिटर ५ व ७ रुपये अनुदान काही दूध उत्पादकांना मिळाले, काही उत्पादकांना काही महिन्यांचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही.
ग्रामीण भागातील गावागावातील शेतकरी आपले कुटुंब दूध व्यवसायावर चालवतात. मात्र, अनुदान न आल्याने ही कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना २०२४ मध्ये दुधाला कवडीमोल भाव मिळत होता. त्यामुळे राज्य सरकारने जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या चार महिन्यांत प्रति लिटर ५ रुपये अनुदान तर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत प्रति लिटर ७ रुपये अनुदान घोषित केले.
काही दूध उत्पादकांना काही महिन्यांचे अनुदान मिळाले तर काही उत्पादकांना काही महिन्यांचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही.
महत्त्वाचे म्हणजे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांत शासनाने प्रति लिटर ७ रुपयेप्रमाणे अनुदान घोषित केले होते. यातील काही उत्पादकांना एकाही महिन्याचे अनुदान मिळाले नाही. थकीत अनुदान कधी मिळणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न आहे. अनेक तरुण दुधाळ जनावरे पाळून आपला उदरनिर्वाह चालवण्याचा प्रयत्न करतात. भाव नसताना घोषित केलेल्या अनुदानाला विलंब होत असल्याने दूध उत्पादक निराश आहेत.
मला ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांतील प्रतिलिटर सात रुपये तसेच मागील चार महिन्यांमधील सप्टेंबर महिन्याचे पाच रुपये अनुदान मिळालेले नाही. आमचा संसार प्रपंच दुधावर अवलंबून आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान लवकरात लवकर वर्ग करावे. - बाळासाहेब घोरपडे, दूध उत्पादक, केलवड
दुधाची ५ रुपये अनुदानाची बाकी असणारी रक्कम येत्या शनिवारी -रविवारी सर्व दूध उत्पादकांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी जिल्ह्याला ३२ कोटी रुपये थकीत अनुदान आता प्राप्त होणार असल्याचे आयुक्तांनी बैठकीत सांगितले. ज्यांचे ७ रुपये अनुदान बाकी राहिले आहे, त्यासाठी शासनाकडे निधी मागवला आहे. हा निधी मिळाल्यावर ७रुपयांचे अनुदान बाकी असलेल्या दूध उत्पादकांना ते मिळणार आहे. - गिरीश सोनोने, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी
अधिक वाचा: जनावरांना कासेचे आजार होऊ नये म्हणून दूध काढण्यापूर्वी व काढल्यानंतर हे करायला विसरू नका