मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेले तीन हजार लिटर दूध संकलनही आता पूर्णपणे बंद झाले आहे. त्यामुळे थेंबबरही दूध नसलेला सोलापूर जिल्हा दूध संघ अशी परिस्थिती जिल्हा संघाची झाली आहे. आता माढा तालुक्यातून ७० व त्यापेक्षा अधिक किलोमीटर अंतरावरून दूध आणण्याचा विचार केला जात असल्याचे सांगण्यात येते.
प्रशासकीय मंडळ संपुष्टात आणून संचालक मंडळाच्या हातात मार्च २०२२ मध्ये कारभार देत असताना दूध संकलन ३०-३५ हजार लिटरवर आले होते. पिशवीबंद (पॅकिंग) दूधही १७ हजार लिटरपर्यंत विक्री होत होती. पेढा, सुगंधी दूध, पनीर व इतर दूग्धजन्य पदार्थ बनविले जात होते.
प्रशासकीय मंडळाला बरेच काही करायचे होते; मात्र मावळत्या संचालक मंडळातील नेतेमंडळी थेट मंत्र्यांकडून दबाव आणत होती. सध्याच्या संचालक मंडळाच्या कालावधीत पहिल्या वर्षभरात प्रतिदिन ९० हजार लिटरवर संकलन गेले होते. मात्र, ते काही टिकले नाही. सर्व प्रकारची दुग्धजन्य पदार्थ निर्मिती बंद केली आता तर पॅकिंग दूधही बंद झाले.
मार्चपर्यंत कर्देहळ्ळी, कोंडी, वीरवडे व पाकणी येथील दूध केगाव शीतकरण केंद्रावर आणले जात होते. केवळ घातलेल्या दुधाचे पैसे मिळत नसल्याने दूध पुरवठा बंद केल्याचे दीपक अवताडे यांनी सांगितले. चाळीस वर्षांखाली संकलनात वरचेवर वाढ होत गेलेले दूध सहा लाख लिटरवर गेले होते.
थेंबही दूध नसताना लढाई
• एक थेंबही दूध संकलन नसलेल्या संघाचा कारभार पाहण्यासाठी संचालक मंडळ न्यायालयीन लढाई करीत आहे. दूध संघ बचाव समितीच्या तक्रारीतील प्रत्येक मुद्द्यावर चौकशी दुग्ध विभाग व लेखा परीक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.
• त्या चौकशीत संचालक मंडळ अस्तित्वात ठेवल्याने संघाचे अधिक नुकसान होईल, असा निष्कर्ष निघाल्याने संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. मात्र, संचालक मंडळाला आणखीन कारभार करायचा आहे. त्यामुळे संचालक मंडळ शासन व न्यायालयीन लढाई करीत आहे.
• विशेष म्हणजे एक तारखेला साधारण ४०० लिटर दूध पाकणी येथील दूध संस्थेने केगाव शीतकरण केंद्रावर आणून घातले होते. मात्र दोन, तीन व चार एप्रिल रोजी दूध संकलन शून्यावरच राहिले आहे. कर्देहळ्ळी, वीरवडे व कोंडी येथील दूध डेअरी यांनी आतापर्यंत पुरवठा केलेल्या दुधाचे पैसे मिळाले नसल्याचे सांगितले.
• वारंवार दुधाच्या पैशाची मागणी मात्र अधिकारी फोन घेत नाहीत, कार्यालयात येत नाहीत, कधी तरी फोन उचलला तरी पैसे उपलब्ध झाले की देऊ, असे सांगतात, असे वीरवडे येथील दूध संस्थेकडून सांगण्यात आले.
हेही वाचा : ऑनलाईन माहिती घेत रणजित करताहेत शेती; १० गुंठे क्षेत्रात झाली अडीच लाखांची पपई