अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे किमान तापमान उतरत आहे. दरम्यान, हवामान विभागाने नोव्हेंबरच्या उत्तरार्धात थंडीची लाट जाणवू शकते, असा अंदाज वर्तविला आहे. पशुधनास तो धोकादायक ठरू शकते.
त्यामुळे पशुपालकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. दोन-तीन दिवसांपासून तापमानात घट होऊन थंडी अधिक जाणवत आहे. थंडीची लाट आल्यास शरीराचे तापमान कमी होते.
त्यातून पशुधनास हायपोथर्मिया, श्वसनाचे आजार, दूध उत्पादनात घट आणि अचानक मृत्यूही होऊ शकतो. नवजात वासरे, अशक्त आणि दुभती जनावरे या काळात सर्वाधिक जोखमीच्या गटात येतात.
पशुपालकांनी हे टाळणे अत्यंत महत्त्वाचे...
जनावरांना थंडीत उघड्यावर बांधू नका. थंड पाणी देऊ नका. ओलसरपणा आणि धूर टाळा. थंडीच्या काळात पशुमेळावे व प्रदर्शने टाळा. मृत जनावरांची विल्हेवाट स्वच्छतेने, पाणवठ्यांपासून दूर करा.
ही लक्षणे दिसताच तत्काळ सल्ला घ्या
जनावरांत थरथर, सुस्ती, अन्न न खाणे, श्वास घेण्यास त्रास, त्वचा काळसर पडणे, दूध उत्पादन घटणे अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा. सरकारी रुग्णालयांत आवश्यक औषधे उपलब्ध आहेत.
थंडीची लाट ही नैसर्गिक आपत्ती असली तरी तिचा परिणाम कमी करणे आपल्या हातात आहे. वेळेवर तयारी, गोठ्यातील व्यवस्थापन आणि पशुवैद्यकीय सल्ल्याच्या पालनामुळे आपले पशुधन सुरक्षित ठेवू शकतो. - डॉ. श्रीधर शिंदे, जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग लातूर.
थंडीपासून बचाव करण्यासाठीचे उपाय...
• गोठ्याभोवती पडदे लावावेत, पत्र्याच्या छपरावर वाळलेले गवत पसरावे. जमिनीवर वाळलेला चारा अथवा कडब्याचा थर ठेवावा. थंडी फार वाढल्यास गोठ्यात बल्ब वापरावा. धूर निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या.
• पशुधनास दिवसातून ३ ते ४ वेळा कोमट पाणी द्यावे. पूरक खाद्य, खनिज मिश्रण, मीठ व जीवनसत्त्वांचा वापर करून जनावरांना संतुलित आहार द्या-
• गोठा कोरडा ठेवावा. ओलावा व धूर टाळा. गोठ्यात तुळस, लेमनग्रास किंवा दनरूडी यांच्या जुड्या लटकवल्यास कीटक दूर राहतात.
• लाळ खुरकत, घटसर्प, पीपीआर, एफएमडी, बीक्यू, एचएस यांसारख्या रोगांविरुद्ध लसीकरण करा. कृमी नियंत्रणासाठी वेळोवेळी औषधे द्या.
• नवजात वासरे, अशक्त, दुभती व आजारी जनावरांना उबदार ठिकाणी ठेवा.
• रानात जनावरे ठेवू नका. मेंढ्यांची लोकर कापणी थांबवा. पक्ष्यांना कोमट पाणी व पौष्टिक खाद्य द्या.
