आज आपण जनावरांमध्ये होणाऱ्या रेबीज रोगाविषयी थोडक्यात माहिती घेऊया. रेबीज हा एक अत्यंत घातक आणि जीवघेणा विषाणूजन्य रोग आहे. रेबीज या रोगाचे कोणतेही उपचार नसल्याने प्रतिबंधात्मक उपाय करणे फायद्याचे ठरते तसेच काही वेळा त्वरित उपचार दिले गेले तरी देखील त्याचा फायदा होतो.
रेबीजचे ९९% प्रसंग हे कुत्र्याच्या चाव्यामुळे होतात. उर्वरित ०१% प्रसंग मांजरी, वानर किंवा अन्य वन्य प्राण्यांच्या चाव्यामुळे होऊ शकतात. अशावेळी रेबिजची बाधा आपल्या जनावरांना झाली तर काय उपचार घ्यावेत? किंबहुना प्रतिबंधात्मक काय उपाय आपण करू शकतो याविषयीची थोडक्यात माहिती आज आपण जाणून घेऊया.
रेबिज बाधित जनावराने चावा घेतल्यास 'हे' करा
• सर्वप्रथम जखमेची जागा साबण किंवा डिटर्जंटने स्वच्छ धुवावी.
• त्या जखमेवर किमान १५ मिनिटे सतत पाणी टाकावे, जेणेकरून काही प्रमाणात विषाणू नष्ट होण्यास मदत होते.
लसीकरण व उपचार
• जखम जर मेंदूपासून जवळ (जसे की जनावरांच्या मानेवर किंवा चेहऱ्यावर) असेल तर ती अधिक धोकादायक मानली जाते. अशा वेळी अँटी-रेबीज अँटीबॉडीज तात्काळ जनावराच्या शरीरात टोचणे/देणे गरजेचे आहे.
• त्यानंतर रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरणाची प्रक्रिया ०, ३, ७, १४ आणि २८ व्या दिवशी अशी करून घ्यावी.
• जर जखम जनावरांच्या शरीराच्या अन्य भागांवर (उदा. पाठीवर, पायावर, कासेवर) असेल आणि रक्तस्राव नसेल, तर फक्त लसीकरणानेही रेबीज टाळता येतो. मात्र यासाठी पशुवैद्यकीय सल्ला आवश्यक आहे.
सावधगिरी आणि प्रतिबंध
• रेबीज एकदा मेंदूपर्यंत पोहोचल्यास कोणताही उपचार शक्य नसतो.
• त्यामुळे जनावरांच्या सुरक्षिततेसाठी वेळोवेळी लसीकरण करणे आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्राण्यांपासून त्यांना दूर ठेवणे आवश्यक आहे.
• पाळीव प्राण्यांच्या लसीकरणाचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळावे.
डॉ. असरार अहमद
सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन
(विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, छत्रपती संभाजीनगर).
हेही वाचा : रेबिज बाधित जनावरांचे दूध सेवन केल्यास रेबिज होतो का? वाचा काय सांगताहेत तज्ञ