वारणानगर : केंद्र शासनाने पशुधनाच्या विकासासाठी देशात प्रथमच खासगी तत्त्वावर तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटर्नरी अॅण्ड अॅनिमल सायन्स या महाविद्यालयास परवानगी दिली आहे.
राज्यात चौथे व पुणे विभागात पहिलेच महाविद्यालय असल्याची माहिती वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जूनपासून महाविद्यालयात प्रवेश सुरू होणार असल्याचेही सांगितले. या महाविद्यालयाची प्रवेश क्षमता ८० असून, पदव्युत्तर शिक्षण सुरू करण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांना पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन ही पदवी मिळणार आहे.
केंद्र सरकारने पशुवैद्यकीय खासगी महाविद्यालयाद्वारे संशोधन व सेवावर भर दिल्यामुळे ग्रामीण भागात पशुवैद्यक तयार होणार असुन त्याचा लाभ राज्यातील दूध उत्पादनवाढीसाठी व इतर जनावरांच्या संगोपनासाठी होणार आहे, असेही डॉ. कोरे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील, कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी, डॉ. कल्पना पाटील, डॉ. यूबी. देशन्नावर, समन्वयक प्रा. जीवनकुमार शिंदे उपस्थित होते.
अन्य तीन महाविद्यालये कुठे आणि कोणती?
१) महात्मा गांधी मिशन ट्रस्ट (एमजीएम), छत्रपती संभाजीनगर.
२) यशोदीप सामाजिक विकास संस्था, सरळगाव (मुरबाड), ठाणे.
३) बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट (परिक्रमा) काष्टी, अहिल्यानगर.
अधिक वाचा: एल-निनोचा प्रभाव तरीही राज्यात मान्सून वेळेवरच येणार; वाचा जेष्ठ हवामानतज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज
