डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कृषी अवशेषांपासून पोषक आणि पाचक अशा प्रकारच्या पशुखाद्य कँडी विकसित केल्या आहेत. यात आवश्यक पोषक तत्त्वांचा समावेश असल्यामुळे गुरांची पचनक्रिया सुधारते आणि दूध उत्पादन वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
तंत्रज्ञानाची राज्यातील चारही कृषी विद्यापीठांकडे शिफारस करण्यात आली आहे. राज्यात सरासरी ५० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी केली जाते. यंदा ४९.६२ लाख हेक्टरवर ही पेरणी झाली आहे. सोयाबीनचे कुटार दरवर्षी मुबलक असते.
परंतु ते गुरांनी थेट सेवन केल्यास अपायकारक ठरते, यामुळे गुरांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो, पाचनशक्तीही बिघडते, या पृष्ठभूमीवर नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
कशी केली जाते कँडी ?
२५ ते ३० लिटर पाण्यामध्ये दोन किलो खडे मिठाचे द्रावण तयार करून त्यात १०० किलो सोयाबीनचे कुटार २० ते २५ मिनिटे भिजवावे, भिजवलेले कुटार मेनकापडात बंद करून रात्रभर चांगले हवाबंद ठेवावे लागते. यात ५ ते १० टक्के गुळाचा वापर करावा. यामुळे कार्बोहॉयडेड वाढतात, यात १ टक्के खनिज मिश्रण वापरल्यास गुरांना चांगला फायदा होतो.
कृषी विद्यापीठाचे निष्कर्ष
कृषी विद्यापीठाने काढलेल्या निष्कर्षानुसार प्रक्रिया केलेल्या कुटारामुळे गुरांची ग्रहण क्षमता व पाचकता सुधारते. गुरांच्या पाणी पिण्याच्या क्षमतेत वाढ होते. दूध उत्पादन वाढविण्यास मदत होते. स्निग्धांश (फॅट) व प्रथिने (प्रोटिन्स) यामध्ये वाढ झाल्याचे आढळून आले असून, दूध उत्पादन खर्चही कमी झाला आहे.
सोयाबीन, तुरीची प्रक्रिया केल्यामुळे गुरांतील पाचकता, पाणी ग्रहण क्षमता वाढते. यामुळे दूध उत्पादन वाढण्याची क्षमता सुधारते. या तंत्रज्ञानाची राज्यातील सर्व कृषी विद्यापीठाकडे शिफारस केली असून संशोधनासाठी पीएच.डी. अभ्यासही सुरू केला आहे. - डॉ. राजेश्वर काळे, शास्त्रज्ञ, पशुसंवर्धन व दुग्ध विकास शास्त्र विभाग, डॉ. पंदेकृवि अकोला.