Join us

आता जनावरांसाठीही आली आयुर्वेदिक औषधे; 'या' दूध संघाने औषधे निर्मितीचा केला पहिला प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 09:45 IST

नियमित औषधांचा वापर वाढल्याने त्याचे गुणधर्म दुधात दिसू लागले आहेत. त्यामुळे आयुर्वेदिक औषधाचा वापर करण्यासाठी संघाने हा प्रकल्प उभा केला.

कोल्हापूर : 'गोकुळ'दूध संघाने जनावरांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून आयुर्वेदिक औषध निर्मितीचा प्रकल्प वर्षापूर्वी सुरू केला, पण जिल्ह्यातील बहुतांशी दूध उत्पादक या औषधाबाबत अनभिज्ञ दिसत आहेत.

संघाच्या पातळीवर त्याचा प्रचार आणि प्रसार कमी पडला की जनावरांसाठी हे औषध गुणकारी नाही, हेच कळत नाही. ज्या उद्देशाने संघाने मोठा गाजावाजा करत हा प्रकल्प सुरू केला, त्याचा उपयोग दूध उत्पादक शेतकऱ्यांना किती झाला, हा खरा प्रश्न आहे.

'गोकुळ'ने 'एनडीडीबी'च्या सहकार्याने वर्षापूर्वी महाराष्ट्रातील पहिला हर्बल पशुपूरक प्रकल्प सुरू केला. संघाच्या गडमुडशिंगी येथील पशुखाद्य प्रकल्पाच्या ठिकाणी सुरू केलेल्या या प्रकल्पातून रोज ४०० किलो विविध सहा प्रकारच्या आयुर्वेदिक औषधांचे उत्पादन घेतले जाते.

नियमित औषधांचा वापर वाढल्याने त्याचे गुणधर्म दुधात दिसू लागले आहेत. त्यामुळे आयुर्वेदिक औषधाचा वापर करण्यासाठी संघाने हा प्रकल्प उभा केला.

संघाच्या पशुवैद्यकीय यंत्रणेमार्फत पशुपालकांपर्यंत हे औषध पोहोचवले जाते. मात्र, जिल्ह्यातील बहुतांशी दूध उत्पादकांना आयुर्वेदिक औषधाबाबत माहितीच नाही.

आयुर्वेदिक औषधांमध्ये काय वापरतात?नैसर्गिकपणे सहज उपलब्ध असणाऱ्या औषधी वनस्पती व स्वयंपाकघरातील रोजच्या वापरातील विविध (कोरफड, हळद, चुना, हाडजोड, कढिपत्ता, लिंबू, कडूनिंब, तुळस, लसूण, जिरे, लोणी, तूप, मोहरी, तीळ तेल, गूळ, शेवगा, पाने, मुळा, लाजाळू पाने, तमालपत्र, विड्याची पाने, काळी मिरी, मोठे मीठ, निंबोळी, घाणेरी पाने, खसखस, हिंग आदी) मसाल्याचे पदार्थाचा वापर करून ही उत्पादने तयार करण्यात आली आहे.

'गोकुळ'चा दावागेल्या वर्षभरात ५२ हजार पशुपालकांनी आयुर्वेदिक औषधांचा वापर आपल्या जनावरांसाठी केला आहे. १ लाख २० पशुपूरक पाऊच व बॉटलची विक्री केल्याचा दावा संघाच्या संबंधित विभागाने केला आहे.

संघाची जनावरांसाठी आयुर्वेदिक औषध आहेत, याबाबत मला काहीच माहिती नाही. वास्तविक ही औषधे कशा प्रकारे गुणकारक आहेत, हे शेतकऱ्यांना सांगितले गेले नसल्याने त्याचा वापर होत नाही. - मारुती खाडे, पशुपालक

अधिक वाचा: महाराष्ट्रातील 'ह्या' कारखान्याने केला विक्रम; सात वेळा ठरला देशात सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधगायशेतकरीकोल्हापूरगोकुळ