नाशिक जिल्हा दुग्ध व्यवसायाने देखील समृद्धेकडे वाटचाल करीत आहे. जिल्ह्याची दुधाची गरज पूर्ण करून दररोज जवळपास दोन लाख ४५ हजार लिटर गाईचे दूधगुजरातसाठी पाठविले जात आहे.
ज्यास ४० रुपये लिटरचा भाव गृहित धरला, तरी यातून दररोजचा ९८ लाख ते एक कोटी रुपयांचा आर्थिक स्त्रोत दूध उत्पादकांसाठी निर्माण झाला आहे. तर, जिल्ह्यातील ८० लाख लोकसंख्येला दररोज सात लाख लिटर दुधाचा पुरवठा होत आहे.
प्रती माणसी १०० ते २५० मि.मि. दूध सहजरित्या उपलब्ध होत असल्याची माहिती जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी वाय. आर. नागरे यांनी दिली. जिल्ह्यात नवीन पशुगणनेनुसार गाय व म्हशींची संख्या चार टक्क्यांनी घटलेली दाखविण्यात आली आहे.
मात्र असे असले, तरी अधिक दूध देणाऱ्या साहिवाल, गीर अन् जर्सी या तीन गाईचे पालनपोषण वाढले असल्याने दुधाचा पुरेसा पुरवठा जिल्ह्याला होत आहे.
६०% गाईच्या दुधाची विक्री
• प्रादेशिक दुग्धव्यवसाय विभागाच्या अभ्यासानुसार जिल्ह्यात ६० टक्के गाईचे, तर ४० टक्के म्हशीच्या दुधाची विक्री होत आहे. गाईचे दूध पचनास हलके, पौष्टिक असते अन् गाईवर औषधांचा मात्रा तुलनेने कमी प्रमाप्णात दिला जात असल्याने गाईच्या दुधाला म्हशीच्या दुधापेक्षा २० टक्के मागणी जास्त आहे.
• २२ लाख लोकसंख्येच्या नाशिक शहरासाठी दररोज अडीच लाख लिटर दूध वाटप होत असून, शहरासाठी दुधाचा पुरवठा मात्र एकूण मागणीपेक्षा २० ते ३० हजार लिटर इतका जास्त आहे. त्यामुळे शहरात दुधाची टंचाई नसल्याची माहिती दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी वाय. आर. नागरे यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यात जवळपास चार लाख लिटर दूध ठोक स्वरूपात विक्री होते. तर, बाकीचे दूध पिशवीबंद पद्धतीने विक्री होते. नाशिक शहरासाठी दुधाची एकूण मागणी मागील दोन वर्षात वाढलेली आहे. विभागात सर्वाधिक दुधाची गरज व एकूण संकलन नाशिक जिल्ह्यात असून, ग्रामीण भागात गो पालन वाढल्याने त्यांच्या दुधाच्या संकलनातही वाढ झालेली आहे. शहर व जिल्ह्याची गरज भागवून जिल्ह्यातील दुध उत्पादक गुजरातसाठी दूध पाठवित आहे. त्याशिवाय पनीर, दुधाची पावडर, श्रीखंड किंवा अन्य प्रदार्थ बनविण्यासाठी दुधाचा पुरेसा पुरवठा होत आहे. - वाय. आर. नागरे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी.
जिल्ह्यासाठी असा असतो वापर (दूध लिटरमध्ये)
६,८४,००० - दूध जिल्ह्यासाठी रोज लागते
८,९२,००० - दूधाचे रोजचे संकलन
१,५१,००० - दूध भुकटी बनविण्यासाठी
३०,००० - दूध व्यवसायासाठी
२,५०,००० - दूध नाशिक शहरासाठी लागते.
७८ कोटी रुपयांचे अनुदान
राज्य सरकारने गायीच्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केल्यानंतर नाशिक विभागातील १ लाख २९ हजार दूध उत्पादकांना तब्बल ७७ कोटी ४९ लाख ९८ हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. नव्याने जाहीर झालेल्या अनुदानास साधारणतः एवढेच दूध उत्पादक पात्र ठरले.
