वारणानगर : दुग्ध क्षेत्रात देशात अग्रेसर असणाऱ्या वारणा सहकारी दूध संघामार्फत दिवाळीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना फरक बिल दिले जाणार आहे.
कामगारांना पगार व बोनस अशी तब्बल ९१ कोटी रुपयांची रक्कम देण्यात येणार असल्याची घोषणा अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
दिवाळीनिमित्त दूध उत्पादकांना प्रतिलिटर म्हैस दुधासाठी २ रुपये ५५ पैसे व गाय दुधास १ रुपये ५५ पैसे इतका विक्रमी फरक बिल देण्याचे जाहीर केले असून म्हैस व गाय दुधासाठी विक्रमी फरक बिल देणारा वारणा दूध संघ एकमेव असल्याचे कोरे यांनी सांगितले.
फरक बिलाची व बोनसची रक्कम येत्या गुरुवारी (दि.९) खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचे संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी सांगितले.
संघाचे उपाध्यक्ष एच.आर.जाधव यांनी या निर्णयामुळे वारणा खोऱ्यातील शेतकरी व कर्मचाऱ्यांचा दिवाळीत लाभ होणार असल्याचे सांगितले.
कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर म्हणाले की, दसऱ्यादिवशी संघाचा बॅण्ड असणाऱ्या वारणा श्रीखंडामध्ये व्हेनिला व स्ट्रॉबेरी या स्वादामध्ये नवे श्रीखंड विक्रीसाठी बाजारात आणले आहे.
वारणा दूध संघ संलग्न असणाऱ्या तात्यासाहेब कोरे दूध साखर वाहतूक संस्था, सावित्री महिला औद्योगिक संस्था, अमृत सेवक पतसंस्था, डॉ. आर. ए. पाटील पतसंस्था, वारणा डेअरी अॅण्ड अॅग्रो इंडस्ट्रीज सर्व संस्थाच्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
यावेळी उपाध्यक्ष एच.आर.जाधव, संचालक मंडळ, अकाउंट्स मॅनेजर प्रवीण शेलार, संकलन व्यवस्थापक डॉ. अशोक पाटील, मार्केटिंग मॅनेजर अनिल हेर्ले, फॅक्टरी मॅनेजर श्रीधर बुधाले, पशुवैद्यकीय व्यवस्थापक डॉ. जे. बी. पाटील आदी उपस्थित होते.
फरक बिल देण्याची पद्धत 'वारणा'तून
सहकारमहर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांनी दिवाळीला दूध उत्पादकांना फरक बिल देण्याची पद्धत देशात सर्वप्रथम वारणा दूध संघाने सुरू केल्याचे सांगण्यात आले.
अधिक वाचा: पाणंद रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी शासन घेतंय 'हा' महत्वपूर्ण निर्णय; लवकरच जीआर काढणार