जयदीप जाधव
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांच्या पोटातील धातू शोधणारे फेरिस्कोप यंत्र दाखल झाले आहे. या यंत्रामुळे रहिमतपूरसह परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे.
कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या अंतर्गत रहिमतपूरसह अपशिंगे, सासुर्वे, बोरीव, दुधी, सायगाव, अशी सहा गावे येतात.
या गावांत म्हैस, गाय, शेळी आदी प्रकारची सुमारे पाच हजार जनावरे आहेत. या गावांतील जनावरांच्या पोटात खिळा, तार आदी धातू गेल्यास जनावरांच्या जीवाला धोका निर्माण होत होता.
जनावराच्या पोटातील धातू शोधण्यासाठी पशुपालकांना कोरेगाव किंवा सातारा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात तपासणी व उपचारासाठी जनावरांना घेऊन जावे लागत होते.
यासाठी वेळ आणि जनावराला ये-जा करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करावी लागत होती. त्यामुळे पशुपालकांवर आर्थिक बोजा पडत होता. जनावर दगावण्याची शक्यताही होती.
पशुपालकांची गैरसोय दूर करण्यासाठी रहिमतपूर पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी डॉ. संजयकुमार भिसे यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पवार यांनी साथ दिली.
जनावरांच्या पोटातील धातू शोधणारे फेरिस्कोप यंत्र रहिमतपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल झाले. यंत्राच्या माध्यमातून जनावरांची तपासणी सुरू केली आहे. जनावराच्या पोटात कुठल्याही प्रकारचा धातू असेल तर जनावर पोट भरून खात नाही.
अधिक वाचा: गाय व म्हैस व्याल्यानंतर कासेवर सुज कशामुळे येते? काय कराल उपाय? वाचा सविस्तर