नंदुरबार : अक्कलकुवा शहरालगतच्या सोरापाडा येथील श्री महाकाली मातेच्या यात्रेतील प्रसिद्ध बैलबाजारात दहा हजार बैलांची आवक झाली आहे. यात्रोत्सवाला रविवारी सुरवात करण्यात आली. यावेळी बैलबाजारात पहिल्या दोन दिवसात दोन कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
सोरापाडा येथील श्री महाकाली मातेच्या यात्रोत्सवात आज दुसऱ्या दिवशी एकूण दहा हजार गावठी, खिल्लारी, नागोरी अशा विविध जातींच्या बैलांची आवक झाली होती. यातील ३ हजार बैलांच्या खरेदी विक्रीतून दोन कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देण्यात आली आहे. यात्रोत्सवात सर्वाधिक एक लाख रुपये विक्रमी किमतीची बैलजोडी विक्री झाल्याचे सांगण्यात आले आहे.
बैल बाजार विक्रीतून व्यापारी आपल्या वाहनांमधून बैलांना वाहून नेत असताना काही वाहनांना पोलिसांनी अटकाव केल्याने आजच्या बैल बाजारात त्याचा परिणाम जाणवल्याचेही सांगण्यात आले. यामुळे पोलिस दलासह महसूल प्रशासनाने बैल बाजारात येणाऱ्या व जाणाऱ्या व्यापारी बांधवांना सवलत देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
गुजरात राज्यातून व्यापारी
अक्कलकुवा येथील कालिका मातेचा यात्रोत्सव बैलबाजारासाठी प्रसिद्ध आहे. येथे सातपुड्याच्या दुर्गम भागातील गावठी बैलांची सर्वाधिक आवक होते. शेतीकामासाठी उपयुक्त असलेल्या या बैलांच्या खरेदीसाठी प्रामुख्याने गुजरात राज्यासह महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून व्यापारी व शेतकरी येतात. येथून पसंतीनुसार बैलजोडी खरेदी करुन हे व्यापारी व शेतकरी परत जातात. अक्कलकुवा येथील यात्रोत्सवात येत्या चार दिवसात मोठी उलाढाल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
